Feroz Khan Death Anniversary : बॉलिवूड अभिनेते फिरोज खान यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. खास स्क्रीन प्रेझेन्स आणि हटके स्टाइलमुळे ते नेहमी चर्चेत राहिले. अभिनयाबरोबर त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही ठसा उमटवला. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी ६० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. फिरोज खान यांचं वैयक्तिक आयुष्यही कायम चर्चेत राहिलं.
बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामध्येही अनेक चढ-उतार आलेले आहेत. असंच काहीसं दिवंगत अभिनेते फिरोज खान यांच्याबरोबरही झालेलं. आज त्यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर ‘एबीपी’च्या वृत्तानुसार फिरोज खान यांचं वैवाहिक आयुष्य चढ-उतारांनी भरलेले होते. त्यांनी घटस्फोटित आणि एका मुलीची आई असलेल्या सुंदरी यांच्याशी लग्न केलं होतं. एका पार्टीत त्यांची सुंदरी यांच्याशी भेट झाली. त्यानंतर दोघांनी जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केलं आणि १९६५ मध्ये लग्नगाठ बांधली. सुंदरी या घटस्फोटित होत्या आणि त्यांना आधीपासून एक मुलगी होती. फिरोज खान आणि सुंदरी खान यांना फरदीन खान आणि लैला खान अशी दोन मुलं झाली. फरदीन खान लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते मुमताज यांचा जावई आहे.
प्रेयसीसाठी पत्नी व मुलांना सोडलं
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या माहितीनुसार, लग्नानंतर काही वर्षांतच फिरोज खान यांच्या आयुष्यात आणखी एका महिलेची एन्ट्री झाली. त्यांची भेट एअर होस्टेस ज्योतिका धनराजगिर यांच्याशी झाली होती. ज्योतिका यांना पाहताच फिरोज त्यांच्यावर फिदा झाले होते. फिरोज यांचे हे अफेअर पत्नी सुंदरी यांना समजताच त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर फिरोज यांनी पत्नी सुंदरी आणि दोन्ही मुलांना सोडले व ज्योतिका यांच्याबरोबर बंगळुरूमध्ये लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले.
पत्नी आणि मुलांकडे परतले फिरोज खान
फिरोज खान आणि ज्योतिका जवळपास १० वर्षे लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहिले. या काळात ज्योतिका वारंवार फिरोज यांच्याशी लग्नाबाबत बोलत होत्या, पण अभिनेता प्रत्येकवेळी हा विषय टाळत होते. त्यामुळे नाराज झालेल्या ज्योतिका यांनी फिरोज खान यांच्याबरोबरचं नातं संपवलं आणि लंडनला निघून गेल्या. ज्योतिका यांच्याबरोबरचं नातं तुटल्यानंतर फिरोज खान पुन्हा पत्नी सुंदरी आणि मुलांकडे परतले. मात्र, पत्नीने त्यांना माफ केले नाही. अखेर १९८५ मध्ये दोघांनी घटस्फोट घेत आपापले मार्ग वेगळे केले.
कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी
फिरोज खान यांचं २७ एप्रिल २००९ रोजी वयाच्या ६९व्या वर्षी फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. २००७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘वेलकम’ हा त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटात त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन आरडीएक्सची भूमिका साकारली होती.
फिरोज खान यांनी आपल्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीत अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलं. त्यामध्ये ‘औरत’, ‘सफर’, ‘मेला’, ‘उपासना’, ‘अपराध’, ‘खोटे सिक्के’, ‘काला सोना’ आणि ‘धर्मात्मा’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी ‘दयावान’, ‘मीत मेरे मन के’, ‘यलगार’, ‘प्रेम अगन’ आणि ‘जानशीन’ या चित्रपटांत अभिनयाबरोबर दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळली.
