पणजी : ‘लेखक चित्रपटाची पहिली संहिता लिहितो, तर अंतिम संहिता मात्र संकलकाची असते’ इतक्या थेट शब्दांत लेखन आणि संकलन या दोन्ही प्रक्रियांमधील फरक आणि त्यांचे महत्त्व ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘थ्री इडियट्स’ सारख्या यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्याकडून ऐकण्याचा योग ‘इफ्फी’च्या मांडवात उपस्थितांनी अनुभवला.
उत्तम चित्रपटासाठी नेमके कोणते घटक आवश्यक ठरतात हे समजावून देताना हिरानी म्हणाले की, मुळात लेखकांनी त्यांच्या अनुभवाच्या मुशीतून उतरणाऱ्या कथा चित्रपटातून मांडायला हव्यात. कथेला वास्तव अनुभवाचा स्पर्श असेल तर त्या विलक्षण ठरतात.
५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) चौथा दिवस हा प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि उत्तम संकलक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकुमार हिरानी यांच्या ‘मास्टरक्लास’ सत्राने गाजवला. ‘फिल्म इज मेड ऑन टु टेबल्स – रायटिंग अँड एडिटिंग’ या विषयावर मार्गदर्शन करताना हिरानी यांनी लेखनापासून प्रत्येक संकल्पना सविस्तर स्पष्ट केली.
‘चित्रपटातून नेमके काय सांगायचे आहे तो विषय वा संकल्पना म्हणजे चित्रपटाचा आत्मा आणि हे सगळे चित्रपटातून रंगवताना त्यात वाद किंवा नाट्य गुंफत जाणे म्हणजे त्याचा ऑक्सिजन, अशा शब्दांत हिरानी यांनी चित्रपट मांडणीतील महत्व सोप्या सरळ भाषेत सांगितले. लेखक आणि संकलक या दोघांमध्ये लेखकाकडे प्रचंड कल्पना स्वातंत्र्य असते.
कथा लिहिताना लेखक सुंदर सूर्यास्त, उत्तम अभिनय येणारे कलाकार, दर्जेदार निर्मिती कसल्या कसल्या आधारे इमले रचतो. मात्र, त्याच्या कल्पनेतून उतरलेली ही दृश्ये संकलकाकडे येतात तेव्हा आपोआपच वास्तवाचे भान चित्रपट निर्मितीत येते. तिथून खऱ्या अर्थाने चित्रपट सुरू होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. संकलन हे त्यांचे पहिले प्रेम आहे हे मान्य करतानाच संकलकाची ताकद सहज लक्षात येत नाही, असेही त्यांनी सांगितले. लेखकाने नेहमी वास्तव आयुष्यातील घटना-अनुभवांच्या आधारे कथा लिहिल्या तर त्या वेगळ्या ठरतात, लोकांना अधिक आवडतात, असेही त्यांनी सांगितले.
