प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते पहलाज निहलानी यांचं निधन झालं आहे. मुंबईतल्या नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहलाज निहलानी हे सेन्सॉर बोर्डाचे माजी प्रमुखही होते. शोला और शबनम, इल्जाम, आँखे, अंदाज अशा चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती. गोविंदा आणि डेव्हिड धवन यांच्यासह त्यांचे चांगले संबंध होते. पहलाज निहलानी यांना लिव्हर सोरायिसस झाला होता. त्यावर उपचारही सुरु होते, पण अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

‘असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्रॅम प्रोड्युसर्स’चं अध्यक्षपद त्यांनी २९ वर्षे सांभाळलं होतं. २००९ मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. तर २०१७ मध्ये त्यांना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आलं होतं. पहलाज निहलानी हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जायचे. त्यांनी १९८२ मध्ये ‘हथकडी” या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली होती. पहलाज यांच्या चित्रपटातून गोविंदा आणि चंकी पांडे यांसारख्या अभिनेत्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

आँखे आणि शोला और शबनम हे चित्रपट ठरले हिट

गोविंदा चंकी पांडे जोडीचा ‘आँखे’ आणि गोविंदा-दिव्या भारती जोडीचा ‘शोला और शबनम’ हे त्यांचे दोन्ही चित्रपट त्याकाळी यशस्वी ठरले होते. २०१२ मध्ये पुन्हा एकदा गोविंदाला मुख्य भूमिकेत घेऊन केलेल्या ‘अवतार’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही निहलानी यांनी केले होते. जवळपास तीन दशके त्यांनी ‘असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्रॅम प्रोड्युसर्स’ या संस्थेचे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली होती. २०१४ मध्ये देशात सत्तापालट झाल्यानंतर निहलानी यांची सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष म्हणून केलेली नियुक्ती वादळी ठरली. या अध्यक्षपदामुळे खऱ्या अर्थाने निहलानी चर्चेत आले.

सेन्सॉर बोर्डाची कारकीर्द ठरली वादळी

सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष म्हणून २०१५ मध्ये सूत्रे हाती घेतल्यानंतर निहलानी यांनी निर्मात्यांना सळो की पळो करून सोडले होते. काही शिव्या, स्त्रियांवरच्या हिंसाचाराची दृश्ये, धार्मिक भावना दुखावल्या जातील असा आशय वा दृश्ये यांना चित्रपटात स्थान मिळणार नाही, असे जाहीर करत त्यांनी अनेक चित्रपटांना सेन्सॉरची कात्री लावली. अनुराग कश्यपची निर्मिती असलेल्या ‘उडता पंजाब’ चित्रपटाला त्यांनी ८० हून अधिक कट्स सुचवले होते. त्याशिवाय, चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. अखेर या निर्णयाविरोधात अनुराग कश्यप यांनी न्यायालयीन लढाईचा मार्ग निवडला.

कुठल्या चित्रपटांना बसला होता फटका?

न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर फक्त एका दृश्याला कात्री लावत ‘उडता पंजाब’ चित्रपट प्रदर्शित झाला. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष म्हणून निहलानी यांनी केलेल्या मनमानीचा फटका ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटालाही बसला होता. जेम्स बाँड श्रृंखलेतील ‘स्पेक्टर’ या चित्रपटातील चुंबनदृश्यालाही त्यांनी कात्री लावली होती. त्यांच्या या कार्यपध्दतीबद्दल हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक नावाजलेल्या निर्माता-दिग्दर्शकांनी त्यांच्यावर टीका केली होती. अखेर २०१७ मध्ये त्यांना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यांनी २०१५ मध्ये एफटीआयआयचे अध्यक्ष म्हणून गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत त्यांना देशद्रोही म्हणत त्यांच्यावर टीका केली होती.