Alexander Stubb On Dhurandhar : २०२५ या वर्षातील सर्वात चर्चेत राहिलेला बॉलीवूड सिनेमा म्हणजे ‘धुरंधर.’ रणवीर सिंह, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल अन् सारा अर्जुन यांच्या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने जगभरात १३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. अशातच आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘धुरंधर’चा सीक्वेल प्रदर्शित होणार आहे. गेले अनेक महिने या चित्रपटाची चर्चा सुरू आहे.
रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ चित्रपटाची क्रेझ फक्त भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती सातासमुद्रापार पोहोचली आहे. फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यातसुद्धा या चित्रपटाबद्दल चर्चा झाली. अलेक्झांडर स्टब यांनी स्वत: याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
अलेक्झांडर स्टब आणि मार्क कार्नी लंडनमधील ‘हाइड पार्क’मध्ये जॉगिंग करत असतानाचा एक व्हिडीओ सध्या एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) शेअर करण्यात आला आहे. यावेळी मार्क कार्नी यांनी अलेक्झांडर स्टब यांना विचारले, “तुमचा भारतातील इन्स्टाग्रामवरील पोस्टचा अनुभव कसा होता?”
‘धुरंधर’बद्दल अलेक्झांडर स्टब काय म्हणाले?
यावर अलेक्झांडर स्टब यांनी उत्तर दिलं की, “मी ‘धुरंधर’ चित्रपट पाहिल्याचं सांगितल्यानंतर भारतातून मला प्रचंड प्रतिसाद मिळाला.” पुढे चित्रपटाच्या विषयावर बोलताना ते म्हणाले, “हा चित्रपट पाहिल्यावर मला जाणवलं की, यात दाखवलेला विषय (दहशतवाद आणि गुप्तचर यंत्रणांचे काम) अत्यंत गंभीर आहे.”
सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल
हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. दोन देशांचे प्रमुख नेते त्यांच्या गप्पांमध्ये ‘धुरंधर’सारख्या भारतीय चित्रपटाचा उल्लेख करत आहेत, ही भारतीय प्रेक्षकांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
No ice-hockey rinks available, so a nice morning run in Hyde Park with Prime minister @MarkJCarney, Diana and Suzanne. pic.twitter.com/frvOts0V6v
— Alexander Stubb (@alexstubb) March 17, 2026
मुलाच्या सांगण्यावरून पाहिला ‘धुरंधर’ चित्रपट
दरम्यान, ४ मार्च रोजी नवी दिल्लीतील ‘रायसीना डायलॉग’ (Raisina Dialogue) साठी अलेक्झांडर स्टब भारतात आले होते, त्यावेळी ‘एएनआय’शी साधलेल्या संवादात ते म्हणालेले, “भारतात येण्यापूर्वी माझ्या मुलाने मला ‘धुरंधर’ पाहण्याचा सल्ला दिला होता. मी तो पाहिला आणि मला तो खूप आवडला. आता १९ मार्चला येणाऱ्या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची मी आतुरतेने वाट पाहत आहे.”
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’चा पहिला भाग ५ डिसेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी एक ठरला. त्यानंतर आता ‘धुरंधर’चा दुसरा भाग बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
