चित्रपट दिग्दर्शक संजय गुप्ता यांचा मृतदेह त्यांच्या वर्सोवा येथील घरात आढळून आला. ही घटना ३१ ऑक्टोबरची आहे. मात्र या घटनेने कलाकारांच्या अशाच काही आठवणींना उजाळा दिला आहे. संजय गुप्ता यांचा मृत्यू जसा झाला ती काही हिंदी चित्रपटसृष्टीतली पहिली घटना नाही. गुरू दत्त यांच्यापासून ते अगदी परवीन बाबी यांच्यापर्यंत अशाच पद्धतीने मृतदेह घरात आढळून आले आहेत. या घटनांची आठवण संजय गुप्तांच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने ताजी झाली आहे. आपण जाणून घेऊ अशाच कलाकारांच्या मृत्यूच्या घटनांबाबत.
गुरू दत्त यांचा मृत्यू झाला तेव्हा लोकांना नंतर बातमी कळली
प्यासा, कागज के फूल, साहिब बिबी और गुलाम अशा अनेक अजरामर चित्रपटांचे दिग्दर्शक आणि अभिनेते गुरू दत्त यांचा मृतदेह १० ऑक्टोबर १९६४ ला मुंबईतल्या त्यांच्या पेडर रोड या ठिकाणी असलेल्या फ्लॅटमध्ये आढळून आला. वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी गुरू दत्त यांनी जगाचा निरोप घेतला. अनेक जण सांगतात की गुरू दत्त यांनी मद्यासह झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि आत्महत्या केली. त्यामुळे गुरू दत्त यांचा मृत्यू हिंदी सिनेसृष्टीत दीर्घकाळ चर्चेत राहिला. गीता दत्त यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. पण त्यांचं नातं तुटलं आणि गुरू दत्त नैराश्यात हरवून गेले. या नैराश्यातच त्यांनी स्वतःला संपवलं असं सांगितलं जातं. त्यांचा मृतदेह अशाच पद्धतीने आढळून आला होता.

परवीन बाबी यांच्या मृत्यूनंतर चार दिवसांनी समजली बातमी
अभिनेत्री परवीन बाबी म्हणजे १९७० आणि १९८० च्या दशकातली एक आघाडीची अभिनेत्री. दिवार, अमर अकबर अँथनी, शान अशा अनेक चित्रपटांमधून परवीन बाबी यांनी काम केलं आहे. २२ जानेवारी २००५ या दिवशी त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आला. कारण त्यांच्या घराचं दार बंद होतं. इमारतीच्या सेक्रेटरीने सांगितलं की दोन दिवसांपासून त्यांनी दुधाच्या पिशव्या आणि वर्तमानपत्र नेण्यासाठीही घराचं दार उघडलेलं नाही. पोलीस त्यांच्या फ्लॅटवर गेले. त्यांनी घराचं दार शेवटी तोडलं तेव्हा परवीन बाबी यांचा मृतदेह त्यांच्या घरात पडलेला आढळून आला. त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यांचा गळा आवळणं, त्यांना विष देऊन मारणं या पैकी कुठलाही प्रकार त्यांच्या बाबतीत घडला नव्हता. त्यांना मधुमेह झाला होता. त्यामुळे त्यांच्या डाव्या पायाला गँगरीन झालं होतं. तसंच त्या नैराश्यात हरवल्या होत्या त्यातच त्यांचा मृत्यू झाला. २००५ मध्ये जेव्हा ही बातमी आली तेव्हा सगळी चित्रपटसृष्टी हळहळली होती.

ओम पुरी यांचा मृतदेह त्यांच्या घराच्या स्वयंपाक घरात आढळून आला
अभिनेते ओम पुरी यांचा मृतदेह जानेवारी २०१७ मध्ये त्यांच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील घरात आढळून आला. त्यांचा ड्रायव्हर त्यांना बोलवण्यासाठी आला होता. पण त्याला ओम पुरी यांनी प्रतिसाद दिला नाही. पोलीस घटनास्थळी आले तेव्हा त्यांना ओम पुरी यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात दिसला. कारण त्यांच्या डोक्याला स्वयंपाक घराचा ओटा लागला होता आणि ते तसेच खाली पडले होते. त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा ही बाब समजली की त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला त्यातच ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

महेश आनंद यांचा मृतदेहही अशाच पद्धतीने आढळून आला
गोविंदा आणि चंकी पांडे यांच्या चित्रपटांमध्ये खलनायक साकारणाऱ्या महेश आनंद यांचा शेवटही अशाच पद्धतीने झलाा. महेश आनंद १९८० आणि १९९० च्या दशकांत त्यांच्या नकारात्मक भूमिकांसाठी प्रसिद्ध होते. वर्सोवा या ठिकाणी ते त्यांच्या फ्लॅटमध्ये राहात होते. एक दिवस त्यांना त्यांच्या बहिणी फोन करत होत्या पण त्यांनी फोन उचलला नाही. अनेक फोन केल्यानंतरही जेव्हा फोन उचलला गेला नाही तेव्हा त्यांच्या बहिणींनी ही बाब पोलिसांना कळवली. पोलीस जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना घराचा दरवाजा तोडावा लागला. महेश आनंद हे घराच्या हॉलमध्ये पडले होते. त्यांच्या शेजारी जेवणाचे डबे होते आणि दारूची बॉटलही होती. शेजाऱ्यांनी त्यांना काही दिवसांपासून पाहिलं नव्हतं ते शुटिंगसाठी गेले असावेत असं त्यांना वाटलं होतं.
डिसेंबर २०२१ मध्ये घडलेली घटना काय?
मिर्झापूर या वेब सीरिजमध्ये ललित हे पात्र साकारणारा कलाकार ब्रह्मा मिश्रा याचा मृतदेहही त्याच्या यारी रोड येथील भाडे तत्त्वावर असलेल्या घरात आढळून आला होता. त्याचा मृतदेह कुजण्यास सुरूवात झाली होती. घराच्या स्वच्छतागृहात त्याचा मृतदेह आढळून आला.
रविंद्र महाजनींचा मृत्यूही अशाच पद्धतीने झाला
मराठी चित्रपटसृष्टीतले देखणे नट अशी ख्याती असलेल्या रविंद्र महाजनी यांचाही मृतदेह २०२३ ला त्यांच्या तळेगाव दाभाडे येथील घरात झाला. त्यांचा मृतदेह जेव्हा मिळाला त्याच्या साधारण तीन दिवस आधी त्यांचा मृत्यू झाला असावा असं पोलिसांनी सांगितलं. त्यांच्या घरातून जेव्हा दुर्गंधी येऊ लागली तेव्हा शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली. ज्यानंतर पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी घराचा दरवाजा तोडला. तेव्हा रविंद्र महाजनी यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली.
