Rakul Preet Singh and Jackky Bhagnani: कलाकार हे त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच जॅकी भगनानीने पत्नी रकुल प्रीत सिंगसह एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. त्या मुलाखतीत त्याने आमचे नाते सिच्युएशनशिपसारखेच असल्याचे म्हटले होते.
रकुल व जॅकी यांनी झिंगाबाद या यूट्यूब चॅनेलला नुकतीच मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल, लग्नाचा निर्णय कसा घेतला त्यावेळी काय विचार केला होता, लग्नानंतर त्यांचे नाते कसे यावर त्यांनी वक्तव्य केले. त्यावेळी त्याने सिच्युएशनशिपचा उल्लेख केला होता. त्यानंतर त्यांच्या वक्तव्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
जॅकी भगनानी काय म्हणाला होता?
अलीकडे अनेक जण सिच्युएशनशिपमध्ये राहतात. त्याबद्दल जॅकी म्हणाला, “आताची तरुण पिढी सिच्युएशनशिपमध्ये राहण्याचा विचार करते. कारण- त्यांना अपेक्षांचा दबाव नको असतो, कोणतीही बंधने नको असतात. मी आणि रकुलन जरी लग्न केलं असलं तरी आमचं नातं सिच्युएशनशिपसारखंच आहे. आम्ही एकमेकांशीच एकनिष्ठ आहोत म्हणूनच आमचं लग्न झालं आहे. पण, सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तिच्याशी कोणत्याही विषयावर बोलू शकतो.”
जॅकी म्हणाला, “जर माझ्या एक्स गर्लफ्रेंडचा फोन आला आणि रकुल माझ्या शेजारी बसलेली असेल, तर मी तो फोन स्पीकरवर ठेवून तिच्याशी बोलू शकतो. कारण- मी रकुलपासून काहीच लपवत नाही. कदाचित माझ्या एक्स गर्लफ्रेंडला थोडं अवघडल्यासारखं वाटेल; पण रकुलला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे.” जॅकीच्या वक्तव्यावर रकुल म्हणाली, “आम्ही एकमेकांचे जवळचे मित्र आहोत.”
आता जॅकी भगनानीच्या सिच्युएशनशिपबद्दलच्या वक्तव्याची चर्चा होत असताना रकुलने सोशल मीडियावर पोस्ट करीत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत लिहिले, “एका मुलाखतीत आम्ही तासभर बोललो. त्यातील एका ओळीचीच चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. ते पाहून आम्ही हसलो. काही वेळा हे मजेशीर वाटतं; पण नेहमीच वाटत नाही. संदर्भ महत्त्वाचा असतो. गोष्टी क्लिकबिट करण्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं समोर आल्या पाहिजेत. काही प्लॅटफॉर्म्स जे दृष्टिकोन मांडतात, त्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे”, असे म्हणत रकुलने तिची निराशा व्यक्त केली.
याच मुलाखतीत जॅकी लग्नाच्या निर्णयाबद्दल असेही म्हणालेला, “आम्ही एकमेकांना म्हणालो की, आता आपण २०-२१ वर्षांचे नाही. आपण आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. वैयक्तिकरीत्या, मी एक आनंदी व्यक्ती आहे. आयुष्यातील कुठलीही पोकळी भरून काढण्यासाठी मी कोणालाही शोधत नाही. कारण- जर मी निराश व्यक्ती असेन, तर माझ्या आयुष्यात कोणीही आलं तरी मी निराशच राहीन आणि वैयक्तिकरीत्या तूसुद्धा आनंदी आहेस. आपण एकत्र आलो, तर आपण जास्त आनंदी राहू.”
दरम्यान, २०२४ मध्ये जॅकी व रकुल यांनी गोव्यात लग्नगाठ बांधली होती.
