Gadar Ek Prem Katha: बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवतात आणि वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून राहतात. त्यापैकीच एक म्हणजे ‘गदर: एक प्रेम कथा’. देशभक्ती, प्रेम आणि भावना यांवर आधारित असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शित होताच प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. तारा सिंह आणि सकीना यांची प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. ‘गदर’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली असून, सनी देओल आणि अमीषा पटेल यांची ही जोडी आजही चाहत्यांमध्ये तितकीच लोकप्रिय आहे. मात्र, या सुपरहिट चित्रपटामागे एक वेगळीच गोष्ट दडलेली आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांना सुरुवातीला ‘गदर’ नव्हे, तर धर्मेंद्र आणि दिलीप कुमार यांना घेऊन ‘काश्मीर’ नावाचा चित्रपट बनवायचा होता; मात्र तो चित्रपट कधीच तयार झाला नाही. काश्मीर चित्रपटाच्या लेखनावेळी समोर आलेली ‘गदर’ची गोष्ट मात्र लोकप्रिय ठरली.
‘गदर : एक प्रेमकथा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी ‘गदर’ सिनेमाचे शूटिंग आणि कथा याबाबत अनेक खुलासे केले आहेत. यावेळी, असा कोणता सिनेमा आहे, जो करायचा मनात होता; पण राहून गेला आणि त्याबद्दल आजही वाईट वाटते, असा प्रश्न विचारण्यात आला. अनिल शर्मा यांनी ‘गदर’च्या पूर्व ‘काश्मीर’ नावाचा सिनेमा करण्याचा विचार असल्याचे सांगितले. काश्मीर सिनेमासाठी धर्मेंद्र व दिलीप कुमार यांच्याशी बोलणे झाले होते; मात्र तो चित्रपट कधीच पूर्ण होऊ शकला नाही, अशी खंत व्यक्त केली.
‘काश्मीर’ची गोष्ट लिहीत असताना ‘गदर’चा प्लॉट समोर
अनिल शर्मा म्हणाले, ” ‘गदर’च्या आधी ‘काश्मीर’ नावाचा एक चित्रपट होता. मला त्या चित्रपटात दिलीप कुमारांसह काम करायचे होते. जेव्हा त्यांना गोष्ट ऐकवली, तेव्हा पहिल्याच भेटीत त्यांनी चित्रपटाला होकार दिला. या सिनेमामध्ये काश्मिरी पंडितांचे जीवन मांडण्यात येणार होते. त्यात दिलीपजींसह धर्मेंद्रसुद्धा होते. असा सिनेमा करण्याचा विचार केला होता. ‘काश्मीर’ची गोष्ट लिहीत असताना योग्य शेवट लिहिण्यासाठी चांगल्या कथानकाची गरज होती. त्यावेळी एक काश्मिरी मुलगा आणि पाकव्याप्त काश्मीरमधील एक मुलगी यांवर आधारित कथा लिहीत असताना ‘गदर’चा प्लॉट आला.”
पुढे ते म्हणाले, ‘काश्मीर’चे कथानक शोधत असताना, मला ‘गदर’ची गोष्ट सापडली. जेव्हा ‘गदर’ची गोष्ट समोर आली, तेव्हा मला जणू रामायणच अवतरले आहे असे वाटले. राम सीतेला लंकेतून परत आणायला जातात, तसेच या नायिकेला आणण्यासाठी नायक दुसऱ्या देशात जातो. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भावेल आणि त्यांना खूप आवडेल आणि यापेक्षा मोठा हिट चित्रपट असूच शकत नाही, असे वाटले. एक दिग्दर्शक म्हणून माझे मन काश्मीरवरून ‘गदर’कडे वळले.”
अनिल शर्मा म्हणाले, “मी दिलीप कुमारांकडे गेलो आणि त्यांना म्हणालो, ‘सर, दुसरी गोष्ट समोर आली आहे आणि मला त्यावर चित्रपट बनवायचा आहे. मी काय करू?’ दिलीपसाहेब लगेच म्हणाले, ‘तुला जे हवं ते बनव, आपण नंतर एकत्र काम करू.’ पण पुढे कधीच तो चित्रपट झाला नाही. त्यामुळे मला आता खूप पश्चात्ताप होतो की, मी तो चित्रपट नंतर कधीच बनवू शकलो नाही. ‘गदर’ इतका ब्लॉकबस्टर ठरला की, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे चित्रपटगृहांना २४-तास शो ठेवावे लागत होते. पण ‘काश्मीर’ चित्रपट बनवण्याचे स्वप्न केवळ स्वप्नच राहिले.”
