Sanjay Leela Bhansali’s one of the most iconic film: संजय लीला भन्साळी हे बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. त्यांचे चित्रपट वर्षानुवर्ष प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘खामोशी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘ब्लॅक, सावरियाँ’, ‘राम लीला’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’ असे सगळेच चित्रपट गाजले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आणखी एका चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. हा चित्रपट म्हणजे ‘गंगुबाई काठियावाडी’ होय.

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘गंगुबाई काठियावाडी’ सिनेमा चांगलाच गाजला. आलिया भट्ट या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. आलियाबरोबरच चित्रपटात शांतनु महेश्वरी, विजय राज, सीमा पाहवा, जिम सर्भ आणि अजय देवगण हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.

प्रियकराने ५०० रुपयांसाठी विकले अन्…

चित्रपटाची गोष्ट गंगुबाई काठियावाडीच्या अवतीभोवती गुंफलेली दिसते. तिचा प्रियकर फक्त पाचशे रुपयांसाठी तिला वेश्यालयात विकतो. त्यानंतर गंगुबाईचे संपूर्ण आयुष्यच बदलते. तिचा एक नवीन प्रवास सुरू होतो.

इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार, ‘गंगुबाई काठियावाडी’ या सिनेमासाठी सुरुवातीला दीपिका पादुकोणला विचारणा झाली होती, मात्र काही कारणांमुळे तिने तो चित्रपट नाकारला. या चित्रपटाआधी दीपिकाने संजय लीला भन्साळींबरोबर ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘राम लीला’ अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. दीपिकाबरोबरच आणखी एका अभिनेत्रीला या चित्रपटासाठी विचारणा झाली होती. ही अभिनेत्री म्हणजे राणी मुखर्जी होय. मात्र, तिनेदेखील हा चित्रपट नाकारला. त्यानंतर आलियाला या भूमिकेसाठी विचारण्यात आले. आलियाने ही भूमिका साकारण्यास होकार दिला.

‘आयएमडीबी’नुसार आलियाच्या या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग रात्री केले होते. सिनेमाच्या कथेनुसार दिवसा याचे शूटिंग करणे शक्य नव्हते. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा आलियाच्या अभिनयाचे कौतुक झाले. संजय लीला भन्साळींनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाचे बजेट जवळजवळ १०० कोटी इतके होते. भारतात चित्रपटाने १३२.०१ कोटींची कमाई केली, तर जगभरात या सिनेमाने २११.५० कोटींची कमाई केली.

‘गंगुबाई काठियावाडी’तील आलियाच्या भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला. इतकेच नाही तर फिल्मफेअर पुरस्कारानेदेखील तिचा गौरव करण्यात आला. आयएमडीबीनुसार सिनेमाने एकूण ४९ पुरस्कार जिंकले, तर आयएमडीबीने या चित्रपटाला ७.६ रेटिंग दिले आहे.

आलिया भट्टच्या आगामी काळातील कामाबद्दल बोलायचे तर ती लवकरच ‘अल्फा’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच ती पुन्हा एकदा संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर काम करताना दिसणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’मध्ये ती दिसणार आहे. यामध्ये रणबीर कपूर आणि विकी कौशल प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.