Genelia & Riteish Deshmukh : गणेशोत्सवानिमित्त सध्या सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मनोरंजनविश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरी देखील लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे. जिनिलीया देशमुखने नुकतीच त्यांच्या घरच्या गणेशोत्सवाची झलक चाहत्यांना दाखवली आहे. देशमुख कुटुंबीय दरवर्षी आपली मराठमोळी परंपरा जपत सगळे सण मोठ्या उत्साहात साजरे करत असल्याचं पाहायला मिळतं. यंदाही रितेश-जिनिलीयाने मोठ्या प्रेमाने अन् भक्तिभावाने बाप्पाचं स्वागत केलं आहे.
जिनिलीयाची जाऊबाई दीपशिखा देशमुखने घरच्या गणपती बाप्पाच्या आगमनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये संपूर्ण देशमुख कुटुंब बाप्पाची मनोभावे प्रार्थना करत असल्याचं पाहायला मिळत आहे. बाप्पाची आरती, पारंपरिक सजावट, उकडीच्या मोदकांचा नैवेद्य याची झलक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. सणासुदीला रितेशसह त्याच्या दोन्ही मुलांनी Twinning लूक केला होता.
तर, मराठमोळ्या लूकमध्ये जिनिलीया खूपच सुंदर दिसतेय. गुलाबी अन् गोल्डन शेडची साडी, गळ्यात पारंपरिक हार, साडीच्या पदरावर कमळाची फुलं, कानात मोत्याचे झुमके, केसात फूल, हातात हिरव्या बांगड्या असा पारंपरिक मराठमोळा लूक तिने आज केला होता. यासह जिनिलीयाचा सासूबाईंबरोबरचा एक गोड फोटो सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये या सासू-सुनेची जोडी एकमेकींकडे बघत अगदी मनसोक्त हसत असल्याचं पाहायला मिळतंय. जिनिलीया अन् तिच्या सासूबाई वैशाली देशमुख यांनी देखील Twinning लूक केला होता. याशिवाय अभिनेत्रीने शेअर केलेल्या फॅमिली फोटोमध्ये त्यांचा श्वान फ्लॅशची झलक सुद्धा पाहायला मिळतेय.


जिनिलीया या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिते, “बाप्पाचं आगमन झालेलं आहे. तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला देशमुख परिवाराकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! बाप्पा मोरया रे!”
दरम्यान, जिनिलीयाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “वॉव मोदक”, “दादा वहिनी खूप सुंदर फोटो आहेत”, “परफेक्ट फॅमिली”, “रितेशने खरंच मुलांना उत्तम संस्कार दिले आहेत, “हीच खरी परंपरा फोटो”, “वहिनी अन् आईसाहेबांचा फोटो…लय भारी” अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी या फोटोंवर दिल्या आहेत.
