Genelia And Riteish Deshmukh : जिनिलीया व रितेश देशमुख यांच्याकडे मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. मराठीसह बॉलीवूड इंडस्ट्रीत सुद्धा या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. रितेश-जिनिलीया जवळपास १० वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यांची पहिली भेट २००२ मध्ये ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. २००२ ते २०१२ अशी १० वर्षे हे दोघंही रिलेशनशिपमध्ये होते. ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये या जोडप्याने दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने थाटामाटात लग्न केलं.
अलीकडेच रितेश-जिनिलीयाने सानिया मिर्झाच्या पॉडकास्टला उपस्थिती लावली होती. यावेळी नात्याविषयी भाष्य करताना जिनिलीया देशमुख म्हणाली, “आम्ही दोघंही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होतो. मी तेव्हा साऊथ चित्रपटांमध्ये जास्त काम करायचे. त्यामुळे एकमेकांना भेटण्यासाठी आम्हाला फार वेळ काढता यायचा नाही. रितेश सुद्धा त्याच्या प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र असायचा. या बिझी शेड्युलमुळे आम्ही फार कधी भेटलोच नाही. तरीही आम्हाला एकमेकांबद्दलच्या सगळ्या गोष्टी माहिती असायच्या. त्यावेळी आम्ही दोघांनी आमच्या करिअरवर लक्ष केंद्रीत केलं होतं.”
आमच्या रूम्स कायम वेगवेगळ्या…
रितेश देशमुख पुढे यावर म्हणाला, “आम्ही लग्नाआधी दहा वर्षे एकमेकांना डेट करत होतो. पण, जेव्हा आमचं लग्न झालं…तेव्हाच आम्ही एकमेकांबरोबर राहायला सुरुवात. त्याआधी आम्ही कधीच एकत्र राहिलो नव्हतो. आम्ही फिरायला वगैरे जायचो पण, कधीच एकत्र राहिलो नाही. आम्ही नेहमी आमच्या मित्रमंडळींबरोबर फिरायला जायचो. त्यामुळे आमच्या रूम्स कायम वेगवेगळ्या असायच्या. कोणतं शूटिंग वगैरे असेल तरीही आम्ही वेगवेगळ्या रूम्समध्ये राहायचो. त्यामुळे जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा पहिल्यांदा आम्ही एकत्र राहिलो आणि तेव्हा खऱ्या अर्थाने एका नव्या जीवनाची सुरुवात केली.”
लग्नानंतर पहिल्यांदा मीडियासमोर जोडीने आलो तेव्हा…
रितेश देशमुख जन्या एका मुलाखतीत म्हणाला होता. “१० वर्षांच्या डेटिंगच्या काळात आम्हाला अनेकदा “तुम्ही दोघं डेट करताय का? तुम्ही एकत्र आहात का?” असे प्रश्न पापाराजींकडून विचारण्यात आले. तेव्हा मी सर्वांना ‘We are just Good Friends’ असं उत्तर द्यायचो. आमचं लग्न झाल्यावर जेव्हा आम्ही पहिल्यांदा मीडियासमोर गेलो तेव्हा सुद्धा मी त्यांना ‘We are still Good Friends’ असं सांगितलं होतं.”
दरम्यान, रितेश-जिनिलीयाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, दोघंही आता ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन स्वत: रितेश करणार असून याची निर्माती जिनिलीया आहे. १ मे २०२६ रोजी हा सिनेमा संपूर्ण देशभरात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे.
