मनोरंजनसृष्टीमधील आदर्श जोडपं म्हणून रितेश-जिनिलीयाकडे पाहिलं जातं. त्यांनी मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. म्हणूनच महाराष्ट्रात त्यांना दादा-वहिनी असं संबोधलं जातं. रितेश देशमुख व त्याच्या कुटुंबीयांचं सोशल मीडियावर नेहमीच कौतुक होत असतं. आता अभिनेता नुकताच त्याच्या पत्नी व मुलांसह अयोध्येत पोहोचला आहे.

जानेवारी महिन्यात अयोध्येतील राम मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला होता. यावेळी रितेश-जिनिलीया हजर राहिले नव्हते. त्यामुळे आता ही जोडी आपल्या दोन्ही मुलांसह रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येला पोहोचली आहे. दर्शन घेतानाचा फोटो रितेशने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : “महाराजांची भूमिका तुम्ही केली नाहीतर…”, चिन्मय मांडलेकरच्या निर्णयानंतर चाहते नाराज; म्हणाले, “दादा प्लीज…”

“मंत्रो से बढके तेरा ना…जय श्री राम! आज तुझं दर्शन घेता आलं आम्ही धन्य झालो #राममंदिरअयोध्या” असं कॅप्शन रितेश देशमुखने या फोटोला दिलं आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या या फोटोवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अयोध्येला जाऊन परंपरा, संस्कृती जपल्याने या जोडीचं कौतुक करण्यात येत आहे.

हेही वाचा : Video : सफाई कर्मचारी महिलांना अचानक शशांक केतकर दिसला अन्…; अभिनेत्याने शेअर केला गोड अनुभव

दरम्यान, रितेश-जिनिलीया सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. आपल्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट ते चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर जिनिलीया लवकरच आमिर खानच्या आगामी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. तर, रितेश सध्या ‘हाऊसफुल्ल ५’ च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.