Raja Shivaji Trailer Launch Genelia Deshmukh Emotional : ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा मुंबईत नुकताच मोठ्या दणक्यात पार पडला. या कार्यक्रमाला रितेश-जिनिलीयासह अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन, महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, चित्रपटाचे संगीतकार अजय-अतुल अशी सगळी दिग्गज मंडळी उपस्थित होती.
‘राजा शिवाजी’ सिनेमासाठी रितेशने गेल्या १० वर्षांपासून मेहनत घेतली आहे. या काळात जिनिलीयाने सुद्धा त्याला खंबीरपणे साथ दिली. आज सगळ्यांनी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या ट्रेलरचं भरभरून कौतुक केल्यावर जिनिलीयाला देखील भरून आलं होतं. तिचे डोळे पाणावले होते…याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जिनिलीया आपल्या भावना व्यक्त करताना प्रचंड भावुक झाली होती. ती म्हणाली, “नमस्कार, मी खूप-खूप इमोशनल आहे. मी या क्षणाला फक्त एकच गोष्ट करेन. मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानते. ( तिने हात जोडून संपूर्ण स्टारकास्टचे आभार मानले ) आमचं हे स्वप्न पूर्ण होण्यात तुमचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार!”
यावेळी रितेश पत्नीबद्दल म्हणाला, “जिनिलीयाशिवाय हे शक्य नव्हतं. स्वप्न पाहणं फार सोपं असतं पण, हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं हा विश्वास मला जिनिलीयामुळे मिळाला. एखाद्या दिग्दर्शकाच्या पाठिशी जर अशी साथ देणारी निर्माती असेल तर अजून काय हवं?”
जिनिलीया देशमुखने ज्योती देशपांडे यांच्यासह ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. याशिवाय तिने चित्रपटात सईबाई राणीसाहेबांची भूमिका साकारली आहे. ट्रेलर लॉन्च सोहळ्यात जिनिलीयाने मराठमोळ्या लूकमध्ये हजेरी लावली होती. गुलाबी रंगाची नऊवारी साडी, गळ्यात सुंदर हार, कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, केसात गजरा या लूकमध्ये जिनिलीया खूपच सुंदर दिसत होती.
दरम्यान, ‘जिओ स्टुडिओज प्रस्तुत’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ निर्मित ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
