Genelia Deshmukh Praises Husband Riteish Deshmukh: अभिनेत्री जिनिलीया देशमुख ही लवकरच ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमिर खानबरोबर ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. जिनिलीया व आमिर खानला एकत्र स्क्रीन शेअर करताना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

जिनिलीया व रितेश देशमुख हे चाहत्यांचे लाडके जोडपे आहे. त्यांना चाहते दादा-वहिनी म्हणून अनेकदा संबोधताना दिसतात. त्यांच्यातील बॉण्डिंग, एकमेकांप्रती असणारा आदर यामुळे अनेक चाहत्यांसाठी हे आदर्श जोडपे आहे. त्यांची मुलेदेखील जेव्हा मीडियासमोर येतात, तेव्हा आदराने हात जोडत नमस्कार करताना दिसतात, त्यामुळे हे सेलिब्रिटी जोडपे व त्याचे कुटुंब कायमच चर्चेचा भाग असते.

रितेशबाबत जिनिलीया म्हणाली…

आता अभिनेत्री जिनिलीया देशमुखने नुकतीच फिल्मीज्ञानला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने पती रितेश तसेच तिच्या मुलांबाबत वक्तव्य केले. जिनिलीया म्हणाली, “रितेश व्यक्ती म्हणून खूप चांगले आहेत. मी खूप नशीबवान आहे की ते माझे जोडीदार आहेत.”

पुढे जिनिलीया असे म्हणाली, “मी आणि रितेश कायम एकमेकांना म्हणत असतो की आपण जोडीदार आहोत. आम्ही एकत्र काम करतो, आम्ही पालक म्हणून दोघेही मुलांची तेवढीच काळजी घेतो, आम्ही निर्णयसुद्धा एकत्र घेतो. रितेशबरोबर गोष्टी खूप सहज आहेत.”

जेव्हा मुलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, तेव्हा ते कायम नमस्ते करताना दिसतात. यावर जिनिलीया म्हणाली, “आम्ही त्यांना शिकवले आहे. माझ्या लहान मुलाने मला व रितेशला एकदा विचारले होते की सगळे आपले फोटो का काढण्यासाठी येतात? तेव्हा आम्ही त्याला सांगितले होते की, मला वाटत नाही की ते तुझे फोटो काढण्यासाठी येतात, त्यामुळे तुला त्यांच्याप्रती कृतज्ञ राहिले पाहिजे. इतकीच गोष्ट आम्ही त्यांना सांगितली आहे आणि मला वाटतं की ती त्यांना समजली आहे.”

रितेश व जिनिलीया २०२२ मध्ये ‘वेड’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. हे सेलिब्रिटी जोडपे सोशल मीडियावर विनोदी रील्स बनवताना दिसतात. या रील्समुळे त्यांचा वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

रितेश देशमुख नुकताच ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याआधी अजय देवगणबरोबर ‘रेड २’ या चित्रपटात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. आता ‘हाऊसफुल ५’ बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आमिर खान व जिनिलीयाची प्रमुख भूमिका असणारा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट २० जूनला प्रदर्शित होणार आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तारे जमीन पर’प्रमाणेच या चित्रपटालादेखील प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठऱणार आहे.