अभिनेत्री जिनिलीया देशमुख सध्या आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ सिनेमामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात जिनिलीया आमिरच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारणार आहे. यानिमित्ताने अनेक वर्षांनी जिनिलीया बॉलीवूडच्या बिग बजेट सिनेमात झळकणार आहे. ‘सितारे जमीन पर’मध्ये मुख्य भूमिका साकारण्यासाठी जिनिलीयाने तीन वेळा ऑडिशन दिली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याविषयी खुलासा केला आहे.
वैयक्तिक आयुष्यात जिनिलीयाने २०१२ मध्ये बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुखशी लग्न केलं. या जोडप्याला रियान अन् राहील अशी दोन मुलं आहे. मुलं झाल्यावर जिनिलीयाने काही वर्षे बॉलीवूडमधून ब्रेक घेतला होता. यानंतर गेल्या काही वर्षांत तिला हव्या तशा भूमिका ऑफर सुद्धा झाल्या नाहीत असं अभिनेत्रीने ‘फिल्मीमंत्रा’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट सांगितलं.
जिनिलीया म्हणाली, “मी ‘सितारे जमीन पर’मध्ये काम करतेय हे जेव्हा सर्वांना समजलं तेव्हा मला प्रत्येकजण मला म्हणत होता, ‘अरे वाह! किती नशिबवान आहेस…तुला आमिर खानच्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली आहे. खरंच ही मोठी गोष्ट आहे.’ यावर मी समोरच्या व्यक्तीला सांगायचे, खरंतर हे आमिर सरांचं मोठेपण आहे की त्यांनी मला ही संधी दिली. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. या सिनेमासाठी मी ऑडिशन दिली होती…मी आजही ऑडिशन देते आणि इथून पुढेही चांगलं काम करण्याचा प्रयत्न असेल.”
गेल्या काही वर्षांत जिनिलीयाला अशाप्रकारच्या मुख्य भूमिका ऑफर झालेल्या नाहीत, यामागचं कारण सांगताना जिनिलीया निर्मात्यांना उद्देशून म्हणाली, “तुम्ही ( निर्माते ) मला अशा प्रकारच्या भूमिका ऑफर करू शकता. पण, आपल्याकडे इंडस्ट्री एका विशिष्ट नियमाने चालते, सगळ्यांनी मर्यादा आखून घेतल्या आहेत. चित्रपटसृष्टी बदलली आहे पण, आता आपली मानसिकता देखील बदलण्याची गरज आहे. कदाचित अनेकांना असंही वाटतं मी विवाहित असल्याने मला अशाप्रकारच्या मुख्य भूमिकांची गरज नाहीये पण, असं काहीच नाहीये.”
अभिनेत्री पुढे म्हणाली की, “जर तुम्हाला सिनेमात विशिष्ट वयाचं पात्र पडद्यावर दाखवायचं असेल तर तुम्ही त्याच वयाच्या एखाद्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला कास्ट केलं पाहिजे, ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. आता मी या ( सितारे जमीन पर ) सिनेमात साकारलेली भूमिका साधारण वयाच्या चाळीशीत असलेल्या महिलेची आहे. अशा भूमिकांसाठी जेव्हा आपण वयाने लहान असलेल्या कलाकारांना कास्ट करतो तेव्हा त्यांना त्या भूमिकांमधले बारकावे समजत नाहीत. यामुळेच योग्य भूमिका निवडणं, पात्रासाठी योग्य व्यक्तीला निवडणं हे खूप महत्त्वाचं आहे. मला आशा आहे की, आयुष्यात प्रत्येकाला ही संधी मिळेल.”
दरम्यान, आर.एस. प्रसन्ना दिग्दर्शित ‘सितारे जमीन पर’ हा सिनेमा २० जूनला प्रदर्शित होणार आहे. सध्या आमिर आणि जिनिलीया या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. या सिनेमात जिनिलीया आमिरच्या पत्नीच्या भूमिकेत झळकताना दिसणार आहे.