कलाकार मंडळी त्यांच्या खाण्या-पिण्याच्या गोष्टींबद्दल नियमीतपणे काळजी घेत असतात. स्क्रीनवर छान दिसण्यासाठी आणि फिटनेस जपण्यासाठी बरीच मेहनत घेत असतात. त्यांचे विविध डाएट रूटीन असतात. पण काही कलाकार मात्र मोकळेपणाने त्यांचे आवडते पदार्थ खात असतात. काहींना आजही जगभरातील विविध प्रकारचे पदार्थ उपलब्ध असून भारतीय पदार्थच खूप आवडतात आणि ते त्यांनाच प्राधान्य देतात. जिनिलीया देशमुखही त्यापैकीच एक आहे.

जिनिलीया देशमुख अनेकदा तिच्या सासरकडच्या गोष्टींबद्दल म्हणजे देशमुख कुटुंबातील प्रथा,परंपरेबद्दल बोलताना दिसते. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या सासरकडच्या जेवणाच्या पद्धतींबद्दल सांगितलं होतं. यावेळी तिने तिला मराठमोळे पदार्थ खूप आवडतात याबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्री नेमकं काय म्हणालेली जाणून घेऊया.

असा असतो जिनिलीयाचा आहार

कर्ली टेल्सला दिलेल्या एका मुलाखतीत रितेश त्याच्या बायकोबद्दल म्हणालेला, “जिनिलीयाला सगळं चटर पटर खायला खूप आवडतं.” त्यावर जिनिलीया म्हणाली, “हो, मला चटर-पटर खायला आवडतं. पण आम्ही रोज वेगवेगळे पदार्थ खात नाही. आमचं जेवण अगदी साधं असतं. रितेशशी लग्न झाल्यानंतर मला महाराष्ट्रीयन ताटाचं महत्त्व समजलं. या ताटात व्हिटॅमिन सी, ओमेगा आणि शरीराला आवश्यक असणारे अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे सर्व पोषणमूल्यं एकाच ताटातून मिळतात, हे मला जाणवलं. माझी मुलं रोज एक चमचा जवस खातात. घरी बनवलेली जवसाची चटणी आणि ठेचा आम्ही जेवणात ठेवतो. घरी बनवल्यामुळे त्यात जास्त तेलही नसतं. त्यामुळे एवढं जरी नियमित खाल्लं, तरी आहार संतुलित ठेवण्यास मदत होते.”

या मुलाखतीत रितेश व जिनिलीया यांनी मांसाहार खाणं बंद केल्याचंही सांगितलं होतं. त्यावेळी रितेशने “फक्त मला काहीतरी खायचं आहे म्हणून त्यासाठी मी एखाद्या प्राण्याचा जीव घेणं मला योग्य वाटत नाही” असं सांगितलं होतं. त्याचवेळी जिनिलीयाने रितेशला मांसाहार सोडणं खूप कठीण गेलं असंही सांगितलं. तिने पुढे रितेशच्या आवडत्या पदार्थाबद्दलही सांगितलं.

जिनिलीया रितेशच्या आवडत्या पदार्थाबद्दल म्हणाली, “त्याला भिंडीची भाजी खूप आवडते. जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा मी त्याला काय खायला बनवू असं विचारलं की तो भिंडीची भाजी बनव असंच उत्तर द्यायचा.”