Riteish Deshmukh Family Raksha Bandhan Celebration Video: अभिनेता रितेश देशमुख व त्याचे कुटुंबीय सगळेच सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरे करतात. रक्षाबंधनच्या दिवशी रितेश, अमित देशमुख आणि धिरज देशमुख हे तिन्ही भाऊ आपल्या कुटुंबासह एकत्र येतात. रितेश-जिनिलियाची मुलं रियान आणि राहिल, चुलत भावंडांबरोबर एकत्र येऊन हा सण साजरा करतात. देशमुखांच्या घरातील यंदाच्या रक्षा बंधनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

धिरज देशमुख यांची पत्नी दिपशिखा देशमुखने रक्षा बंधन सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. रितेश व अमित देशमुख या दोन्ही भावांना दोन-दोन मुलं आहेत. तर धिरज देशमुख यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. तिन्ही भावांच्या मुलांना लाडकी व एकुलती एक बहीण दिवियाना देशमुख हिने राखी बांधली. या सेलिब्रेशनला जिनिलीया देशमुखचे भाऊ व वहिनी देखील आले होते. सर्वांनी एकत्र हा सण साजरा केला.

“दिवियानाला जगातील बेस्ट, अत्यंत क्युट लहान भाऊ भेटले आहेत आणि ते माझे लाडके लाडू चोर आहेत. मला खूप आनंद होतोय आणि घरातील मिठाई तर यांच्यापासून कधीच वाचू शकत नाही. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा,” असं कॅप्शन लिहून दिपशिखा देशमुखने व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिवियाना सर्वांना राखी बांधताना दिसतेय.

पाहा देशमुख कुटुंबाच्या रक्षा बंधन सेलिब्रेशनचा व्हिडीओ

मुलांनी पापाराझींना केला नमस्कार, अमित देशमुखांनी वेधले लक्ष

रक्षा बंधन सेलिब्रेशननंतरचा देशमुख कुटुंबाचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओत रितेश-जिनिलीया व त्यांची मुलं, धिरज-दिपशिखा देशमुख व त्यांची मुलं, त्याचबरोबर अमित देशमुख त्यांची पत्नी अदिती व त्यांची मुलं दिसत आहेत. दिपशिखाचा भाऊ जॅकी भगनानी व जिनिलीयाचे दादा-वहिनी हा सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. रितेश व धिरज यांची मुलं बरेचदा एकत्र दिसतात. पण आज दोघांबरोबरही अमित देशमुखांना पाहून चाहत्यांना फार आनंद झाला.

वूम्प्ला या पापाराझी पेजवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत सर्वजण आनंदाने कॅमेऱ्यांसमोर पोज देत आहेत. त्याचबरोबर नेहमी प्रमाणे देशमुख कुटुंबातील सर्व मुलं नमस्कार करत आहेत. ‘सर्वजण एकत्र खूपच छान दिसत आहेत,’ अशा कमेंट्स या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.