Ghajini Actor Pradeep Rawat Passes Away : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि ‘गजनी’ चित्रपटातील मुख्य खलनायक प्रदीप रावत यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘लगान’ चित्रपटातील त्यांचे सहकलाकार यशपाल शर्मा यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाची दुःखद माहिती दिली. ‘महाभारत’ मधील ‘अश्वत्थामा’ ते ‘गजनी’ मधील व्हिलेन अशा विविध भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते.

‘लगान’ चित्रपटातील प्रदीप रावत यांचे सहकलाकार यशपाल शर्मा यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. “आमचा गजनी आणि लगानचा देवा प्रदीप रावत आता आपल्यात नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो,” अशी पोस्ट त्यांनी इन्स्टाग्रामवर केली आहे.

यशपाल शर्माची पोस्ट

Ghajini and Lagaan actor Pradeep Rawat passes away at 74
यशपाल शर्माची प्रदीप रावत यांच्या निधनाबद्दल पोस्ट (सौजन्य- इन्स्टाग्राम)

अभिनेत्री रोशनी अचरेजाने एनडीटीव्हीशी बोलताना प्रदीप रावत यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला. प्रदीप रावत गेल्या अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. सुरुवातीला त्यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र नंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं होतं, तिथेच त्यांचं निधन झालं.

प्रदीप रावत यांचे करिअर

प्रदीप रावत यांनी आपल्या करिअरची सुरुवात बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेतून केली होती. या मालिकेत त्यांनी ‘अश्वत्थामा’ची भूमिका साकारली होती. प्रदीप रावत यांनी राज बब्बर यांच्या ‘ऐतबार’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर त्यांनी ‘अग्निपथ’, ‘पत्थर के फूल’, ‘संगदिल सनम’, ‘कोयला’, ‘सरफरोश’ आणि ‘लगान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं, मात्र त्यांना खरी ओळख ‘गजनी’ चित्रपटातून मिळाली.

प्रदीप रावत यांनी हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये केलं काम

‘गजनी’ चित्रपटात प्रदीप रावत यांनी मुख्य खलनायकाची भूमिका केली होती. त्यांच्या भूमिकेला खूप लोकप्रियता मिळाली होती. ‘गजनी’ हा चित्रपट २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त प्रदीप रावत यांनी तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्येही विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. बहुतांश चित्रपटांमध्ये त्यांनी व्हिलेनच्याच भूमिका केल्या होत्या. प्रदीप रावत चित्रपटांबरोबरच मालिकांसाठीही ओळखले जायचे. दूरदर्शनवरील ‘तहकीकात’, ‘चंद्रकांता’, ‘युग’ आणि ‘गुल सनोबर’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्येही त्यांनी काम केलं होतं.