Girija Oak on Kangana Ranaut: गिरीजा ओक ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजपर्यंत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. काही दिवसांपूर्वी ती ‘द लल्लनटॉप’च्या एका पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी तिने निळ्या रंगाची साडी नेसली होती. तिचा तो लूक, साधेपणा लोकांना आवडला. अचानक ती नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाऊ लागली. अभिनेत्री सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. ती विविध पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या फॉलोअर्सची संख्यादेखील मोठी आहे. तिचे अनेक लूक, फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात.
अभिनेत्री लवकरच ‘भारत भाग्य विधाता’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सिनेमाचे कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. विविध मुलाखतींमधून ते सिनेमाबद्दल, कलाकारांबद्दल व्यक्त होत आहेत. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान आलेला अनुभव याबद्दल ते सांगत आहेत. याबरोबरच कलाकार आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर सिनेमाचे पोस्टर शेअर करत आहेत.
गिरीजा ओक म्हणाली…
आता अभिनेत्री गिरीजा ओकने एका मुलाखतीत कंगना रणौत यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर काय घडले, याबद्दल वक्तव्य केले आहे. गिरीजा ओकने नुकतीच एनडीटीव्हीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, “माझा एक नवीन चित्रपट येत आहे. १२ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ‘भारत भाग्य विधाता’ असे त्या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमात आम आदमी आपण ज्याला म्हणतो, रोजची कामे करणारे आपले जे सहकारी आहेत; सफाई कर्मचारी, पोलिस, दवाखान्यातील नर्स अशी सगळ्या प्रकारची दैनंदिन आयुष्य सुरळित राहावं यासाठी काम करणारे जे लोक आहेत, त्यांचं हे सेलिब्रेशन आहे. कारण ही गोष्ट कामा हॉस्पिटलमधील नर्सेसबद्दलची आहे. २६/११ ला जो हल्ला झाला होता, तो कामा हॉस्पिटलवरही झाला होता, त्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही तर त्या रात्रीची ही गोष्ट आहे. ताज, सीएसएमटी अशा सगळ्या ठिकाणी जिथे जीवितहानी प्रचंड प्रमाणात झाली, त्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, कारण ते आकडे आपल्या कानावर पडले आहेत. ती दृश्ये आपण पाहिली आहेत. तिथे साडे तीनशे-चारशे माणसं वाचवली गेली, तर त्याची ही गोष्ट आहे. त्या सिनेमाचे पोस्टर आणि इतर गोष्टी मी सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. या चित्रपटाची निर्मिती कंगना रणौत यांनी केली आहे, त्यामध्ये त्यांनी उत्तम काम केले आहे. आता मी कंगना रणौत यांची पोस्ट शेअर केल्यानंतर अनेक हजारांनी माझे फॉलोअर्स कमी झाले, कारण मी त्यांचा फोटो पोस्ट केला होता.”
पुढे गिरीजा ओक म्हणाली की, त्यानंतर मी दुसरी एक पोस्ट शेअर केली तर फॉलोअर्स वाढले. आपल्या वेगवेगळ्या पोस्टनुसार फॉलोअर्स कमी-जास्त होतात, त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांना खूश ठेऊ शकत नाही. मी प्रत्येकाला आनंदी ठेवू शकत नाही. तर त्या फॉलोअर्सच्या संख्येचं, किती लोकांनी आपली पोस्ट पाहिली याचं खरंच काय महत्त्व आहे तर काहीही नाही. शेवटी तुम्हाला तुमचं काम करत राहायचं आहे. तुम्हाला जो निर्णय योग्य वाटतोय, तो घेत राहायचा आहे. तुमच्या मनात जे येतं ते बोलत राहायचं आहे, या पलीकडे काहीच नाही.
दरम्यान, आता हा सिनेमा प्रेक्षकांना आवडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
