१९९० चे दशक हिंदी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत धोकादायक होते, कारण त्या काळात अंडरवर्ल्डचा प्रभाव खूप जास्त होता. अनेक अभिनेते आणि दिग्दर्शकांनी त्यांना अंडरवर्ल्डकडून धमक्यांचे फोन आल्याचं सांगितलंय. तर काहींवर गँगस्टर्सच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे गोळ्याही झाडण्यात आल्या होत्या. मात्र, दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनी एका मुलाखतीत खुलासा केला की, त्यांना असे फोन कधीच आले नाहीत. उलट, त्यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘सत्या’ आणि ‘कंपनी’ यांसारख्या चित्रपटांमुळे गँगस्टर्सना त्यांच्याबद्दल आपुलकी वाटायची, असा दावा त्यांनी केला आहे.

‘दाऊद इब्राहिममुळेच माझं घर चालतं’

‘फिल्मफेअर’शी बोलताना राम गोपाल वर्मांनी म्हटलं की, त्यांनी त्यांचे आत्मचरित्र ‘गन्स अँड थाईज’ दाऊद इब्राहिमला समर्पित केलं होतं, पण प्रकाशकांनी त्याचं नाव काढून टाकले. “मी ते पुस्तक दाऊद इब्राहिमलाही समर्पित केलं होतं, पण प्रकाशकांनी त्याचं नाव हटवलं. जर दाऊद इब्राहिम नसता, तर मी ‘सत्या’ आणि ‘कंपनी’सारखे दोन अजरामर चित्रपट बनवू शकलो नसतो. मग मी त्याला हे पुस्तक कसे समर्पित करणार नाही? त्याच्यामुळेच मी आज माझं घर चालत आहे,” असं वर्मा म्हणाले.

राम गोपाल वर्मांना धमक्यांचे फोन का आले नाहीत?

९० च्या दशकात इतर कलाकार आणि दिग्दर्शकांप्रमाणे त्यांना कधी धमक्यांचे फोन आले का? त्यावर ते म्हणाले, “मी एकमेव असा माणूस होतो ज्याला कधीच धमक्यांचे फोन आले नाहीत, कारण त्यांना ‘सत्या’ आणि ‘कंपनी’ हे चित्रपट खूप आवडले होते. त्यांना मला त्रास द्यायचा नव्हता. मी एक प्रकारे त्यांचा ‘सोलमेट’ झालो होतो.”

Ram Gopal Varma discussing underworld connection and his films Satya and Company(1)
राम गोपाल वर्मा

‘सत्या’ आणि ‘कंपनी’ला अंडरवर्ल्डने पैसा पुरवला होता का?

एएनआयशी बोलताना मुंबईचे माजी सह-पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) डी. शिवानंदन यांनी खळबळजनक दावा केला होता. १९९८ ते २००१ दरम्यान मुंबईतील अंडरवर्ल्ड संपवण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या होत्या. शिवानंदन यांच्या मते, राम गोपाल वर्मा यांच्या काही चित्रपटांसाठी गँगस्टर्सनी पैसा पुरवला होता. ‘सत्या’, ‘कंपनी’, ‘शूटआऊट ॲट वडाळा’ आणि ‘शूटआऊट ॲट लोखंडवाला’ यांसारखे चित्रपट गँगस्टर्सची प्रतिमा सुधारण्यासाठी बनवण्यात आले होते. या सर्व चित्रपटांना अंडरवर्ल्डनेच पैसा पुरवला होता. इतकंच नाही तर १९७० च्या दशकातील ‘दीवार’ आणि ‘मुकद्दर का सिकंदर’ सारख्या चित्रपटांनाही त्यांनीच अर्थसहाय्य केल्याचा दावा त्यांनी केला होता.

१९९० च्या दशकात अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि इतर तंत्रज्ञ अंडरवर्ल्डच्या दबावाखाली असायचे. दिग्दर्शक करण जोहरने खुलासा केला होता की, त्याचा पहिला चित्रपट ‘कुछ कुछ होता है’ प्रदर्शित झाला तेव्हा त्याला धमक्यांचे फोन आले होते. वरुण धवननेही अलीकडेच सांगितलं की, त्याचे वडील डेव्हिड धवन यांनाही असेच फोन येत असत. टी-सीरीजचे मालक गुलशन कुमार यांची तर गँगस्टर्सनी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या केली होती.