Govind Namdev gets legal notice from Kala Hiran makers : ‘काला हिरण’ चित्रपट हा सलमान खानच्या काळवीट शिकार प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे. या चित्रपटावरून सिनेविश्वामध्ये वाद निर्माण झाला आहे. ‘काला हिरण’ चित्रपटाच्या निर्मात्यांना भाईजान सलमानने कायदेशीर नोटीस पाठवल्याने चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाची कथा लक्षात येताच अनेक कलाकारांनी या चित्रपटातून एक्झिट घेतली आहे. सलमानसह ‘वॉन्टेड’ चित्रपटामध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव यांनी चित्रपटातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. मात्र, ऐन वेळी माघार घेतल्याने आता ‘काला हिरण’च्या निर्मात्यांनी गोविंद नामदेव यांना ५० लाख रुपये भरण्याची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यावरून पुन्हा एकदा कलाकार व निर्मात्यांमधील वाद उफाळून आला आहे.
‘काला हिरण’ चित्रपटामध्ये सलमानची कथित मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सोनू मिश्रा यानेसुद्धा चित्रपटातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. दोन दिवसांची शूटिंग केल्यानंतर त्याने हा निर्णय जाहीर केला होता. चित्रपटाच्या निर्मात्यांनी फसवणूक केली असून, त्यांचा हेतू लक्षात आल्याने प्रोजेक्टमधून बाहेर पडत असल्याचे सोनूने स्पष्ट केले. तसेच सिनेमाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सलमान खानविरोधात बोलण्याबाबत सांगण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा सोनूने केला आहे. त्यामुळे ‘काला हिरण’ चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सलमान खानसह काम करणारे अभिनेते गोविंद नामदेव यांनी चित्रपट सोडत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ‘काला हिरण’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी अमित जानी यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
५० लाख रुपयांचा दंड अन् जाहीर माफी
‘काला हिरण’ चित्रपटाचा ट्रेलर आऊट झाला असून, त्यामध्ये १९९८ सलमान खानच्या काळवीट शिकार प्रकरणावर कथित चित्रपटाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. त्यामध्ये प्रमुख भूमिकेचे नाव आयान खान दाखवण्यात आले आहे; तर अभिनेते गोविंद नामदेव यांना विरोधी पक्षातील वकिलांची भूमिका दिली गेली आहे. चित्रपटामध्ये काळवीट शिकार आणि बिश्नोई गँगचा उल्लेख करण्यात आला आहे. अभिनेते गोविंद नामदेव यांनी कॉन्ट्रॅक्ट करून हा चित्रपट पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र त्यांनी अचानक चित्रपटातून माघार घेत प्रोजेक्ट सोडल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे निर्माते अमित जानी यांनी गोविंद नामदेव यांना ५० लाख रुपयांचा दंड भरण्यासह जाहीर माफी मागण्याची नोटीस बजावली आहे. प्रॉडक्शन हाऊसचे नुकसान झाल्याने त्यांनी गोविंद नामदेव यांना ५० लाख रुपयांचा दंड भरण्यास आणि सात दिवसांच्या आत सार्वजनिकपणे जाहीर माफी मागण्यास सांगितले आहे.
सलमान खानची मर्जी राखायची असल्यामुळे प्रोजेक्टमधून बाहेर – अमित जानी
निर्माते अमित जानी यांनी एक्सवर पोस्ट करून गोविंद नामदेव यांनी सलमान खानच्या नजरेमध्ये चांगले राहण्यासाठी चित्रपट सोडत असल्याचा आरोप केला आहे. अमित जानी म्हणाले की, गोविंद यांना चित्रपटाच्या कथेची पूर्ण कल्पना होती. कारण- त्यांनी चित्रपटाची पटकथा वाचल्यानंतरच काम करण्यास होकार दिला होता. गोविंद नामदेव यांनी कोर्टरूममधील सीनचे शूटिंग केले असून, त्यावरून चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यांना फक्त याच नाही तर चित्रपटाच्या सीक्वेलसाठीसुद्धा साईन केले होते. त्यांना अशा पद्धतीने चित्रपटाची बदनामी करण्याचा हक्क नव्हता. गोविंद नामदेव यांना आता सलमान खानची मर्जी राखायची असल्यामुळे या प्रोजेक्टमधून बाहेर पडायचे असल्याचा आरोप निर्मात्यांनी केला आहे.
रणवीर सिंहप्रमाणे पुन्हा निर्माते आणि कलाकारांमध्ये वाद
चित्रपट करण्याबाबत कॉन्ट्रॅक्ट करून कलाकार अचानक प्रोजेक्टमधून बाहेर पडल्याचे जाहीर करीत असल्याची प्रकरणे वाढत आहेत. अभिनेता रणवीर सिंह याचा ‘डॉन ३’ चित्रपट निर्मात्यांशी नुकताच वाद झालेला असताना आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. रणवीरनेदेखील ‘डॉन ३’ चित्रपटातून अचानक माघार घेतल्याने प्रॉडक्शन हाऊसचे प्रचंड नुकसान झाले. शूटिंगसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना हे केल्याने फरहान अख्तर आणि रणवीर सिंह यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. त्यामुळे ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ने (FWICE) थेट बंदीची कारवाई केली होती. हे प्रकरण ताजे असताना आता गोविंद नामदेव यांनी ‘काला हिरण’ चित्रपटातून माघार घेतल्याने निर्माते आणि कलाकारांमधील आणखी एक वाद समोर आला आहे.
