Govinda on relationship with Neelam Kothari: गोविंदाला ९० च्या दशकातील सुपरस्टार म्हणून ओळखले जाते. एकापाठोपाठ एक असे त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. गेल्या काही दिवसांपासून मात्र अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

गोविंदाची पत्नी सुनीता आहुजांनी त्याचे अफेअर असल्याचे म्हटले होते. तसेच १९८०, १९९० च्या दशकात नीलम कोठारीबरोबर तो रिलेशनशिपमध्ये होता, अशा चर्चा मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. आता मात्र गोविंदाने मुलाखतीत यावर वक्तव्य केले.

“मी कधी विचारही केला नव्हता की…”

गोविंदाने नुकतीच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीत गोविंदाला विचारले की तो नीलमच्या प्रेमात होता का? यावर अभिनेता म्हणाला, “आम्हा गावातील तरुणांना गोऱ्या मुली आवडतात. ती सगळ्यांपेक्षा वेगळी होती, चांगली मुलगी होती, ती बाहुलीसारखी वाटत असे.”

“मी तिचे चित्रपट पाहत असे. मी कधी विचारही केला नव्हता की मला तिच्याबरोबर काम करण्याची संधी मिळेल. जेव्हा तिने माझी नायिका म्हणून काम केले, तेव्हा मला विश्वास बसला नाही.”

‘लव्ह ८६’ या चित्रपटातून नीलम आणि गोविंदाची ऑनस्क्रीन जोडी चांगलीच गाजली होती. हा चित्रपट १९८६ ला प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्यांनी ‘हत्या’, ‘सिंदूर’, ‘खुदगर्ज’ या चित्रपटांत एकत्र काम केले. हे चित्रपटही चांगलेच गाजले.

गोविंदा नीलमबरोबर रिलेशनशिपमध्ये होता की नाही, यावर स्पष्टपणे बोलला नाही. पण, त्याच्या मनात अभिनेत्रीबद्दल भावना निर्माण झाल्या होत्या असे वक्तव्य त्याने केले. तो म्हणाला, “आता जसे अफेअर्स होतात, तसे, त्या काळात अफेअर्स होत नसत. पण, आम्ही सेटवर खूप दंगा करत असू. आम्ही विचार करायचो की आमच्यात काहीतरी घडत आहे.”

रोमान्सची व्याख्या त्या काळात काय होती यावर गोविंदा म्हणाला, “त्या काळात फक्त पाहणे हा रोमान्स असायचा. आम्ही एकत्र खूप चांगले काम केले आहे. प्रत्येक चित्रपट पाहा. गाणे, चित्रपट सुपरहिट ठरले होते.”

१९९० ला गोविंदाने स्टारडस्टला मुलाखत दिली होती, त्यावेळी तो नीलमच्या प्रेमात होता हे त्याने कबुल केले होते. इतकेच नाही, तिच्या प्रेमात पडल्यानंतर त्याने सुनीता आहुजांबरोबरचा साखरपुडा मोडला होता, कारण त्याला नीलमबरोबर लग्न करायचे होते. गोविंदा म्हणालेला, “आम्ही अनेकदा भेटायचो. जितके मला तिच्याबद्दल माहीत झाले, तितकी ती मला जास्त आवडली. ती इतकी प्रेमळ होती, कोणताही पुरुष तिच्या प्रेमात पडेल. मी माझा सुनीताबरोबरचा साखरपुडा मोडला. मला नीलमबरोबर लग्न करायचे होते. मला वाटत नाही की त्यामध्ये काही चुकीचे होते.”

दरम्यान, गोविंदाने आईच्या शब्दासाठी सुनीता आहुजाबरोबर लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. गेल्या काही काळात हे जोडपे विभक्त झाल्याच्या अनेक चर्चा झाल्या, मात्र गोविंदा आणि सुनीता यांनी त्या चर्चा अफवा असल्याचे सांगितले.