Govinda accepts wife Sunita Ahuja’s cheating claims: गोविंदा व सुनीता आहुजा अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येतात. सुनीता आहुजा काही दिवसांपूर्वी लॉक अपच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्यावर वक्तव्य केले होते. तसेच त्या विविध मुलाखतींमध्ये गोविंदाच्या अफेअरबद्दल बोलताना दिसतात.
९०च्या दशकात गोविंदाचे त्याच्या सहअभिनेत्रीबरोबर अफेअर असल्याचे सुनीता आहुजांनी अनेकदा म्हटले आहे. आता गोविंदाने या सगळ्यावर वक्तव्य केले आहे. गोविंदा नेमकं काय म्हणाला याबद्दल जाणून घेऊ…
गोविंदाने नुकताच एएनआयशी संवाद साधला. या मुलाखतीत गोविंदा म्हणाला, “ती मला खूप प्रेमाने ओरडते, माझ्याबद्दल वाईट बोलते आणि ते सर्व मी प्रेमाने स्वीकारतो”, असे गोविंदा हसत म्हणाला. तसेच, त्याच्या यशस्वी कारकिर्दीचे श्रेय त्याने पत्नीला दिले. याबरोबरच, चांगल्या-वाईट काळात बरोबर राहिल्याबद्दल आणि मुलांना उत्तम पद्धतीने वाढवल्याबद्दल त्याने सुनीताप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
गेल्या वर्षी सुनीता आहुजांनी पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत दावा केला होता की, रवीना टंडन एकदा गमतीने म्हणाली होती की, गोविंदाचं सुनीताबरोबर आधीच लग्न झालेलं नसतं तर मी त्याच्याशी लग्न केलं असतं. रवीना आणि गोविंदा यांनी दिवाना मस्ताना, दुल्हे राजा, बडे मियां छोटे मियां आणि आंटी नंबर १ अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
गोविंदाने सुनीताबरोबर घडलेला एक मजेशीर प्रसंग सांगितला. तो म्हणाला, “सुनीता मला जेव्हा काही सांगायची, तेव्हा माझी आई तिला म्हणायची की सुनीता, तुझ्यामुळेच तो हिरोईनला भेटत नाही. तो पॅक-अप झाल्यानंतर थेट घरी येतो.”
तो असेही म्हणाला, “मी वयाच्या ३४ वर्षांपर्यंत खूप भोळा होतो. मी इतका भोळा का होतो याची मला लाज वाटते. मिठाईच्या दुकानात राहूनही तुम्ही उपाशी बाहेर पडलात तर त्यापेक्षा दुःखाची गोष्ट काय असू शकते?”
गोविंदा असेही म्हणाला की, त्याचे त्याच्या सिनेमातील हिरोईनबरोबर प्रेमाचे नाते होते. तो म्हणाला, “तुम्ही माझ्याबरोबर काम केलेल्या कोणत्याही हिरोईनला भेटा. त्यांना इतर अभिनेत्यांबद्दल विचारले तर त्या लाजतील आणि म्हणतील की तो माझ्याबरोबर चांगले वागला. पण, तुम्ही जर माझ्याबद्दल विचारले तर प्रेमामुळे त्यांच्या डोळ्यांत अश्रू येतील. असे अश्रू विकत आणता येत नाहीत, ते मनापासून आलेले असतात”, असे म्हणत अभिनेत्याने वक्तव्य केले.
