बॉलीवूड अभिनेता गोविंदा अनेकदा त्याच्या आयुष्यातील गोष्टी, घडामोडींबद्दल मोकळेपणाने सांगत असतो. अशातच नुकतंच त्याने त्याच्या आयुष्यातील काही जुने प्रसंग सांगितले आहेत. यावेळी त्याने इंडस्ट्रीतील त्याला आलेले अनुभवही सांगितले आहेत. वजन वाढल्यानंतर मुख्य भूमिका मिळणार नाही अशी भीती होती असंही तो म्हणाला. यावेळी त्याने सलमान खानबद्दलही भाष्य केलं.
गोविंदाने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सलमान खानबरोबरचा एक जुना किस्सा सांगितला. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पार्टनर’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यापूर्वी दोघांमध्ये ही चर्चा झाली होती. त्यावेळी सलमान खान कठीण काळातून जात होता. गोविंदाने सलमानला स्वतःवर काम करण्याचा सल्ला दिला होता. तसेच, पुढील दहा वर्षे तो चित्रपटसृष्टीवर राज्य करेल, असंही त्याने सलमानला सांगितलं होतं. अशी आठवण अभिनेत्याने आता सांगितली आहे.
गोविंदा त्याच्या वाढलेल्या वजनामुळे निर्माण झालेल्या भीतीबद्दल म्हणाला…
गोविंदा पुढे म्हणाला, “त्यावेळी माझं वजन ११४ किलो होतं. नुकताच मी राजकारणातून बाहेर पडलो होतो. मी त्याला म्हणालो, माझं वजन कमी होईपर्यंत मी कॅरेक्टर आर्टिस्ट झालेलो असेन ना? पार्टनरमध्ये ज्या प्रकारच्या भूमिका करत होतो, तशाच करत राहीन. मी कॉमेडी करत होतो.”
तो पुढे म्हणाला, “मी त्याला सांगितलं, तू हिरो आहेस पण सध्या तू हिरोसारखा दिसत नाहीस. तू दुःखी दिसतोयस, अस्वस्थ दिसतोयस. या सगळ्यातून बाहेर ये.”
सलमानच्या कठीण काळात गोविंदाने दिलेला सल्ला
गोविंदांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर सलमानने त्याला “मी काय करू?” असं विचारलं. गोविंदा पुढे म्हणाला, “त्याने मला विचारलं, मी काय करू? तेव्हा मी त्याला सांगितलं, दिवसातून दोन-तीन तास व्यायाम कर. धर्मेंद्रकडे पाहा. धर्मेंद्रनंतर तू एकमेव असा नायक आहेस, ज्याला देवाने आई-वडील, भावंडं, देखणा चेहरा आणि उत्तम व्यक्तिमत्त्व असा सगळा आशीर्वाद दिला आहे. तुझ्यात असा खास गुण आहे जो लोकांना तुझ्याकडे पाहून हा हिरो आहे असं म्हणायला भाग पाडते.” गोविंदाच्या म्हणण्यानुसार, सलमानने त्याचा सल्ला ऐकला आणि त्यानंतरच्या काळात त्याला मोठं यश मिळालं. गोविंदाने सलमानला पुढील दहा वर्षे तू इंडस्ट्रीवर राज्य करशील, असंही सांगितलं होतं. तो म्हणाला, “त्याने ते करून दाखवलं. मी त्याला सांगितलं होतं, तू दहा वर्षे राज्य करशील आणि त्याने खरंच दहा वर्षे इंडस्ट्रीवर राज्य केलं.”
डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘पार्टनर’ या चित्रपटात सलमान खान आणि गोविंदा मुख्य भूमिकेत होते. २० जुलै २००७ रोजी प्रदर्शित झालेला हा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटातील सलमान आणि गोविंदाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. चित्रपटातील ‘डू यू वाना पार्टनर’, ‘सोनी दे नखरे’ आणि ‘यू आर माय लव्ह’ यांसारखी गाणीही चांगलीच लोकप्रिय झाली होती.
