‘ठरलं तर मग’ मालिका सध्या महाराष्ट्राच्या घराघरांत चांगलीच चर्चेत आहे. यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी सायलीच्या सासुबाईंची महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. आजवर त्यांनी अनेक लोकप्रिय मालिका तसेच ९० च्या दशकातील सुपरहिट बॉलीवूड सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. प्राजक्ता कुलकर्णी यांनी लक्ष्मीकांत बेर्डे, गोविंदा, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांबरोबर विविध चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे.

गोविंदा त्याच्या चित्रपटांच्या सेटवर नेहमी कॉलटाइमच्या वेळेपेक्षा उशिरा जायचा असा खुलासा आजवर अनेक कलाकारांनी केला आहे. याबाबत आता प्राजक्ता कुलकर्णींनी सुद्धा सांगितलं आहे. प्राजक्ता कुलकर्णी व गोविंदा यांनी ‘आग’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. यामध्ये गोविंदासह कादर खान, शिल्पा शेट्टी, शक्ती कपूर अशा बऱ्याच लोकप्रिय कलाकारांची मांदियाळी होती.

“गोविंदा सेटवर वेळेत यायचा का?” याबद्दल प्राजक्ता कुलकर्णी ‘अभिजात मराठी फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगतात, “जे सगळ्यांनी ऐकलंय ते अगदी खरंय. तो सेटवर उशिराच येतो. त्यावेळी आमच्या सिनेमाचं शूटिंग आऊटडोअरला सुरू होतं. आता जेव्हा असं बाहेर शूट असतं…तेव्हा राहण्याची व्यवस्था तिथेच जवळपास केली जाते. त्यामुळे उठून फक्त सेटवर यायचं असतं. पण, त्यातही त्याला उशीर व्हायचा. त्या सिनेमात भरपूर कलाकार होते. आम्ही सगळे सकाळपासून येऊन सेटवर बसायचो पण, गोविंदा नेहमी सेटवर दुपारनंतर यायचा.”

त्या पुढे म्हणाल्या, “आमचा कॉलटाइम सकाळी नऊ वाजताचा असायचा. त्याला रोज रवीजी ( दिग्दर्शक के. रवी शंकर ) सांगायचे, ‘गोविंदाजी कल टाईम पे आना हा…’ पण, तो कधीच वेळेत आला नाही. आमची अर्धी शिफ्ट अशीच फुकट जायची. गोविंदाशिवाय जे काही काम असायचं…त्याच्याशिवाय जे काही शूटिंग असायचं ते आम्ही करून घ्यायचो. पण, गोविंदाबरोबरचे सीन्स दुपारनंतरच शूट व्हायचे.”

“गोविंदा एकदा सेटवर आला की सगळं पटापट शूट करायचा. मग, तेव्हा अजिबात टाईमपास वगैरे नसायचा. मी आणि शिल्पा शेट्टी तेव्हा मग गोविंदा सेटवर येईपर्यंत फावल्या वेळात कादर खानकडून उर्दू शिकायचो.” असं प्राजक्ता कुलकर्णी यांनी सांगितलं.