Govinda upcoming film: १९८६ ला प्रदर्शित झालेल्या ‘इल्जाम’ या सिनेमातून गोविंदाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याच वर्षी ‘तन बदन’ व ‘लव्ह ८६’ हे सिनेमेही प्रदर्शित झाले होते. गोविंदाचे अनेक सिनेमे गाजले. त्याच्या फक्त अभिनयाचेच नाही, तर त्याच्या डान्सचेदेखील मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. हीरो नंबर १, कुली नंबर १, पार्टनर, राजा बाबू, आँखे, दीवाना मस्ताना, साजन चले ससुराल अशा अनेक सिनेमांतून गोविंदाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

गोविंदाचा डायलॉग म्हणण्याचा अंदाज,विनोदी भूमिका साकारण्याची त्याची शैली यांमुळे गोविंदाचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. ९० च्या दशकात तो सुपरस्टार म्हणून ओळखला जात होता. त्याने अनेक अभिनेते, तसेच लोकप्रिय अभिनेत्रींबरोबर काम केले आहे. मात्र, अभिनेत्याची ही लोकप्रियता काही काळानंतर कमी झाल्याचे पाहायला मिळाले. २०१९ मध्ये रंगीला राजा या सिनेमातून गोविंदा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, त्यानंतर तो कोणत्याच सिनेमात दिसला नाही. विविध मुलाखतींमधून लवकरच पुन्हा एकदा तो मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याचे वक्तव्य बऱ्याचदा त्याने केले आहे.

“मी जे स्वप्न पाहिले आहे, ते…”

आता गोविंदा कोणत्या सिनेमात दिसणार हे समोर आले आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत अभिनेत्याने याबद्दल वक्तव्य केले आहे. रूपा, असे या सिनेमाचे नाव आहे. सिनेमात गोविंदाबरोबर नवोदित कलाकार राणी स्वर्णकरदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. पत्रकार परिषदेत गोविंदाने अभिनेत्रीची ओळख करून दिली. विशेष म्हणजे अभिनयाबरोबर गोविंदा या सिनेमाची निर्मितीदेखील करणार आहे.

गोविंदा सिनेसृष्टीत कमबॅक करण्याबद्दल म्हणाला, “कदाचित हे नशिबातच होतं की, मला अनेक वेळाचित्रपटांतूनवगळण्यात आलं. लोक सतत म्हणायचे की, आता तो चित्रपटांमध्ये दिसणार नाही; पण मी नेहमीच नवीन सुरुवात केली. मी जे स्वप्न पाहिले आहे, ते या चित्रपटातून पूर्ण होऊ दे, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. ही अशी गोष्ट आहे, ज्याची लोक कल्पनाही करू शकत नाहीत.”

तो पुढे म्हणाला, “हा चित्रपट खास तरुणांसाठी आहे. जेव्हा ते चित्रपटगृहात चित्रपट पाहतील, तेव्हा त्यांना स्वप्न पाहण्याची आणि ती स्वप्नं सत्यात उतरू शकतात यावर विश्वास ठेवण्याची प्रेरणा मिळेल, अशी मला आशा आहे.”

दरम्यान, गोविंदाचा हा नवीन सिनेमा कधी प्रदर्शित होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गोविंदाचा नवीन सिनेमा कमाल करू शकणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.