Bollywood Actor Govinda : बॉलीवूड अभिनेता गोविंदा हा अनेकदा सेटवर, तसेच काही कार्यक्रमांना उशिरा येत असल्याचं त्याच्या सहककलाकारांनी सांगितलं आहे. प्रल्हाद कक्कर, दिग्दर्शक अनीस बज्मी व निर्माते वाशू भगनानी यांनीही याबाबत काही घटना सांगितल्या आहेत. अशातच अबू मलिक यांनीसुद्धा गोविंदाच्या उशिरा येण्याचा एक प्रसंग सांगितला.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत संगीतकार व आयोजक अबू मलिक यांनी एक जुना प्रसंग सांगितला. महाराष्ट्रातील पुसद या गावात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तो कार्यक्रम गोविंदाची बहीण पद्मा शर्मा यांचे पती व निर्माता आत्मप्रकाश शर्मा यांनी आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला येण्यासाठी गोविंदाला हेलिकॉप्टरही पाठवण्यात आले होते. तरीसुद्धा तो त्या कार्यक्रमाला आला नव्हता.

अबू मलिक यांनी माँ कसम या कार्यक्रमात सांगितले, “गोविंदा खूप मोठा स्टार झाला होता. त्यानं मला त्याच्यासाठी एक शो करायला सांगितलं, जेणेकरून त्याचे थोडे पैसेही वाचतील. मी त्याच्यासाठी आधीच एक चित्रपट करत होतो, त्यामुळे मी हा शो फुकट करायला तयार झालो. हजारो लोक कार्यक्रमासाठी आले होते आणि मैदान पूर्णपणे भरले होते; पण गोविंदा काही आलाच नाही.”

यावेळी अबू मलिक यांचे धाकटे भाऊ, संगीत दिग्दर्शक डब्बू मलिक यांनी तेव्हा तो प्रसंग सावरला. ते दिसायला गोविंदासारखे असल्यानं त्यांनी अबू मलिक यांना मदत केली. त्याबद्दल अबू म्हणाले, “लोक सतत गोविंदाबद्दल विचारत होते. मी वारंवार सांगत होतो की, तो लवकरच येईल, लवकरच येईल; पण तो काही आलाच नाही. १५ हजार लोक त्या कार्यक्रमाला आले होते आणि सगळे फक्त गोविंदाबद्दलच विचारत होते. मला काय करावं सुचतच नव्हतं. शेवटी मी माझ्या भावाला गोविंदाच्या गाण्यांवर नाचायला सांगितलं. कारण- तो थोडा थोडा त्याच्यासारखाच दिसत होता.”

शो संपताच अबू मलिक आणि त्यांची टीम बसने तिथून निघून गेली, जेणेकरून प्रेक्षकांचा राग टाळता येईल. त्याबद्दल ते म्हणाले, “मी आधीच एक बस मागे उभी ठेवली होती. माझ्या भावाने ‘आय अ‍ॅम अ स्ट्रीट डान्सर’ हे गाणे सादर केले आणि कार्यक्रम संपताच आम्ही लगेच बसमध्ये बसून निघून गेलो.”

उशिरा येण्याबाबत गोविंदाचे स्पष्टीकरण

दरम्यान, उशिरा येण्याबद्दल एकदा गोविंदानं मुकेश खन्नांना दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिले होते. त्यानं म्हटलेलं की, तो गरिबीतून पुढे आला आहे. जास्त पैसे कमवण्यासाठी त्यानं अनेक चित्रपट साइन केले होते. तो म्हणालेला, “मी दिलीप कुमार यांचा शिष्य आहे. मी कधीच उशिरा येत नव्हतो. जसे शास्त्रीय गायक कार्यक्रमापूर्वी त्यांच्या गायनाची तयारी करतात, तसा मी स्वतःला तयार करूनच सेटवर जायचो. आजपर्यंत मी कुणालाही फसवलं नाही. मी उशिरा पोहोचत असलो तरी मी माझी कामं आणि जबाबदाऱ्या नेहमीच पार पाडल्या आहेत.”