Govinda Health Updates : अभिनेता गोविंदाची प्रकृती बिघडल्याने मंगळवारी रात्री उशिरा त्याला जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अभिनेत्याला राहत्या घरी चक्कर आली होती. क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांकडून त्याच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. आता सगळे रिपोर्ट्स आल्यावर अभिनेत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

“खूप खूप धन्यवाद…मी आता बरा आहे. जास्त व्यायाम केल्याने मला थकवा आला अन् चक्कर आली. योग, प्राणायम करणं या गोष्टी चांगल्या आहेत पण, मी जास्तच थकलो. सध्या मी माझी पर्सनालिटी सुधारण्याचा प्रयत्न करतोय. डॉक्टरांनी सुद्धा मला काही औषधं लिहून दिली आहेत.” असं गोविंदाने ANI शी संवाद साधताना सांगितलं आहे.

गोविंदाची प्रकृती बिघडली तेव्हा त्याच्या पत्नी सुनीता आहुजा एका नातेवाईकांच्या लग्नानिमित्त शहराबाहेर गेल्या होत्या. अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच सुनीता आहुजा रात्री उशिरा मुंबईत परतल्या.

दरम्यान, गोविंदाच्या मॅनेजरने स्क्रीनला दिलेल्या माहितीनुसार, “सरांना थोडं चक्कर आल्यासारखं वाटलं त्यानंतर त्यांचं डोकं जड झालं म्हणून आम्ही त्यांना न्यूरोलॉजिस्टकडे तपासणीसाठी घेऊन आलो. सरांना आता बरं वाटत आहे, ते विश्रांती घेत आहेत काळजी करण्यासारखं काही नाही. आम्हाला फक्त त्यांना चक्कर का येतेय हे जाणून घ्यायचं होतं. न्यूरोलॉजीच्या डॉक्टरांनीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. आता सरांची मुलगी टीना त्यांच्याबरोबर आहे.”

दरम्यान, गोविंदाला जुहू येथील क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. अभिनेत्याच्या प्रकृतीवर डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून होती. तसेच आवश्यक चाचण्या सुद्धा करण्यात आल्या होत्या. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये गोविंदाने त्याच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरने चुकून स्वतःच्या पायात गोळी झाडल्याने त्याला जुहू येथील याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.