बॉलीवूड अभिनेता गोविंदा अनेकदा त्याच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. अभिनेता अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यातील घडामोडींबद्दल मोकळेपणाने भाष्य करत असतो.अनेकदा कुटुंबाबद्दही तो बोलताना दिसतो. अभिनेत्याने आतापर्यंत अनेकदा त्याच्या आईच्या आठवणी सांगितल्या आहेत. अशातच आता पुन्हा त्याने याबद्दल भाष्य करत आईच्या निधनानंतरचा काळ त्याच्यासाठी किती कठीण होता याबद्दल सांगितलं आहे.

गोविंदाने त्याच्या आई निर्मला देवी यांच्या निधनानंतरच्या कठीण काळाबद्दल भाष्य केलं आहे. त्याने सांगितलं की, आईच्या निधनानंतर एकदा तो नर्मदा नदीत उतरला होता, कारण पुन्हा आईला भेटता येईल, असा त्याचा विश्वास होता. ANIला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने १९९६ मध्ये आईच्या निधनानंतरचा कठीण काळ आणि अनुभव सांगितले आहेत. आईच्या निधनानंतर तो प्रचंड वेदनेत होता आणि आयुष्यातील सगळं काही संपल्यासारखं वाटत होतं, असं त्याने सांगितलं.

गोविंदाने सांगितला आईच्या निधनानंतरचा कठीण काळ

गोविंदा म्हणाला, “मी खूप दुःखात होतो. मला प्रचंड वेदना होत होत्या. त्या वेळी मला असं वाटलं की सगळं काही संपलं आहे; बस, आता काहीच उरलं नाही.” शास्त्रीय गायिका आणि अभिनेत्री निर्मला देवी यांचं १५ जून १९९६ रोजी वयाच्या ६९व्या वर्षी निधन झालं. गोविंदाचं त्याच्या आईशी खूप जवळचं नातं होतं. त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात आईच्या आध्यात्मिक प्रभावाची महत्त्वाची भूमिका असल्याचंही त्याने अनेकदा सांगितलं आहे. नर्मदा नदीतील त्या घटनेची आठवण सांगताना गोविंदा म्हणाला, “मी नर्मदा नदीजवळ होतो. मला वाटलं की नदीत थोडं पुढे गेलो तर मी पुन्हा माझ्या आईला भेटू शकेन. त्यामुळे मी नदीत पुढे गेलो.” गोविंदाला हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न होता का, असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “एका अर्थाने हो. माझं माझ्या आईशी खूप घट्ट नातं होतं. माझं तिच्यावर खूप प्रेम होतं.”

मात्र, या घटनेकडे तो केवळ आत्महत्येच्या दृष्टिकोनातून पाहत नसल्याचं त्याने पुढे स्पष्ट केलं. तो म्हणाला, “जग याला अशाच पद्धतीने पाहतं. लोक आत्महत्येसारखे शब्द वापरतात. पण आमच्यासाठी असं काही नाही. आयुष्य कधीच संपत नाही. ते नवं रूप घेतं, नवी रूपं धारण करतं.”

मुलांसाठी जगलं पाहिजे याची जाणीव झाली – गोविंदा

गोविंदाने सांगितलं की, एका साधूंनी त्याला नदीतून बाहेर यायला मदत केली. गोविंदा म्हणाला, “त्यांनी मला हाक मारली आणि माझ्याकडे आले. मी नदीतून बाहेर आलो. त्यानंतर त्यांनी मला विचारलं, काय झालं, गोविंद?” अभिनेत्याने पुढे सांगितलं की, या अनुभवामुळे त्याला आयुष्याचा पुन्हा विचार करण्याची संधी मिळाली. तो म्हणाला, “त्यावेळी कोणीतरी मला सांगितलं की मी जे करत आहे ते चुकीचं आहे. त्यातून मी एक धडा शिकलो. मला जाणवलं की मला माझ्या मुलांसाठी जगायचं आहे.” गोविंदाने सांगितलं की, या मानसिक अवस्थेतून पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी त्याला जवळपास १० ते १५ दिवस लागले. त्यानंतर त्याला जाणवलं की या जगात अजूनही बरंच काही आहे, जे त्याला अनुभवायचं आहे. त्यामुळे त्याने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर चित्रपट आणि स्टारडमकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलला, असं त्याने सांगितलं.

तो म्हणाला, “माझ्यासाठी चित्रपट म्हणजे खेळण्यांसारखे आहेत. हे बोलू नये, असं मला वाटतं; देवाच्या भीतीपोटी मी हे सांगत आहे. माझ्या या बोलण्याने कोणाचा अपमान होत असेल तर मला माफ करा. पण माझा विश्वास आहे की चित्रपट, अभिनय, स्टारडम, हिरो असणं हे सगळं देवाचंच एक रूप आहे. आपल्याला जे काही मिळालं आहे, ते देवाने दिलं आहे आणि आपण केवळ त्यात आपली भूमिका साकारत आहोत. आपण हे सगळं पाहिलं आणि अनुभवता आलं, एवढंच.”

गोविंदा पुढे म्हणाला, “पण माझ्यासाठी खरी कामगिरी ही होती की मी माझ्या कुटुंबाची आणि आईची सेवा करू शकलो. तिने माझ्यासाठी जी स्वप्नं पाहिली होती, वयाच्या २१व्या वर्षी माझा मुलगा गोविंदा काय साध्य करेल, याबद्दल तिने ज्या इच्छा मनात बाळगल्या होत्या, त्या मी पूर्ण करू शकलो. ते तिचं स्वप्न होतं आणि मी ते पूर्ण करू शकलो. माझ्या आयुष्यातील त्या टप्प्यात मला गोष्टींकडे पाहण्याचा हा खूप वेगळा दृष्टिकोन मिळाला.”