Govinda Rajesh Khanna : बॉलीवूडमध्ये काही कलाकार हे त्यांच्या सोशल मीडियासाठी किंवा त्यांची एक प्रतिमा तयार करण्यासाठी पीआर टीमची मदत घेतात. पण असाही एक काळ होता, जेव्हा कलाकारांना अशा कोणाच्या मदतीशिवाय प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत होते. कलाकारांचा अभिनय आणि त्यांची स्टाइल हीच त्यांची खरी ओळख होती आणि त्यामधून त्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता. यामध्ये बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना आणि बॉलीवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांचे नाव आवर्जून घेतले जाते. अभिनेता गोविंदाने राजेश खन्ना व धर्मेंद्र यांच्या अभिनयाचे कौतुक करत, त्यांच्या पहिल्या भेटीचा अनुभव शेअर केला आहे.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये गोविंदाने त्याचे सिनेविश्वातील अनुभव सांगितले. यावेळी त्याने धर्मेंद्र व राजेश खन्ना यांच्याबरोबर झालेल्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली. या दोन्ही कलाकारांनी इमेज-बिल्डिंगच्या मागे न लागता फक्त कामातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आणि प्रचंड यश मिळवल्याचे नमूद केले. गोविंदा म्हणाला, “धर्मेंद्रजी आणि राजेश खन्ना यांनी त्यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलं आणि त्यामुळे त्यांना प्रचंड यश मिळालं, त्यामुळेच ते इतके मोठे स्टार बनले. त्यांनी स्वतःची जाणीवपूर्वक वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही, त्यांनी फक्त अभिनयावर लक्ष दिलं आणि कामातून हे यश मिळवलं होतं.”

गोविंदा आणि राजेश खन्ना यांच्या पहिल्या भेटीमध्ये काय घडलं होतं?

पुढे गोविंदाने त्याची राजेश खन्ना यांची स्वर्ग सिनेमाच्या सेटवर पहिली भेट झाल्याचे सांगितले. यावेळी राजेश खन्नांनी गोविंदाला एक खास प्रश्न विचारला होता. तो म्हणाला, स्वर्गच्या सेटवर आमची पहिल्यांदा भेट झाली, त्यावेळी राजेशजींनी विचारलं, गोविंदा, तू आता जिथे असायला हवा होतास तिथे का नाहीस?” यावर मी त्यांना उत्तर दिलं, ‘काका, देवाने तर आधीच सगळं ठरवलेलं आहे. प्रत्येक झाडाची उंची किती असावी आणि त्याची मर्यादा काय असावी हे देवाला माहीत आहे. प्रत्येक झाड कुठे लावायचं हेसुद्धा त्याला माहीत आहे. आपण सगळे तर फक्त या सुंदर बागेचा एक भाग आहोत.”

गोविंदा पुढे म्हणाला, “राजेश खन्ना यांनी मला विचारलं, ‘तुला जे मिळालं आहे त्यात तू आनंदी आहेस का?’ यावर मी ‘हो’ असं उत्तर दिलं होतं.” गोविंदाने राजेश खन्ना यांच्या अभिनयाचे आणि त्यांच्या स्वभावाचे कौतुक केले. तो म्हणाला, “राजेश खन्ना हे अतिशय प्रेमळ व्यक्ती होते. ते एक सुसंस्कृत आणि मनमिळाऊ व्यक्ती होते.”

गोविंदा व राजेश खन्ना यांच्या ‘स्वर्ग’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद

दरम्यान, गोविंदा आणि राजेश खन्ना यांनी १९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘स्वर्ग’ या सिनेमात एकत्र काम केलं होतं. याचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केले होते. या चित्रपटात गोविंदाने कृष्णा ही भूमिका साकारली होती, तर राजेश खन्ना यांनी उद्योगपती अनिलचं पात्र साकारलं होतं. या दोघांमधील नातं आणि त्यांच्यावर आधारित कथा प्रेक्षकांना आवडली होती. यामध्ये जुही चावला, परेश रावल आणि कादर खान यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. ‘स्वर्ग’मधील गोविंदा आणि राजेश खन्ना यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या