बॉलीवूड अभिनेता गोविंदा अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याचे मराठी अभिनेत्रीबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याच्याही चर्चा सुरू असतात. त्याच्या पत्नी सुनिता आहुजा यांनी अनेकदा याबद्दल भाष्य करत त्याचे कोमल नावाच्या मुलीबरोबर संबंध असल्याचं म्हटलं होतं. नुकतंच अभिनेत्यानेही त्याच्याबद्दलच्या या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. अशातच आता गोविंदा त्याच्या कथित गर्लफ्रेंडबरोबर स्पॉट झाल्यानंतर या चर्चांना उधान आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे सुनिता आहुजा यांनीही याबद्दल प्रतिक्रिया देत राग व्यक्त केला आहे.

गोविंदाने अलीकडे एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील कोणालाच माहीत नसलेले किस्से, प्रसंग, अभिनय क्षेत्रातील प्रवास आणि त्याच्यावर झालेले रिलेशनशिपसंदर्भातील आरोप याबद्दल भाष्य केलं. तर अशातच आता विमान तळावर गोविंदा कोमलबरोबर (Komal Rani Swarnkar) एकत्र दिसल्याने दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. सुनिता यांना याबद्दल विचारल्यानंतर त्यांनी विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हटलं आहे.

सुनिता आहुजा यांची प्रतिक्रिया

सुनीता आहुजा यांनी गोविंदाला अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकारबरोबर मुंबई विमानतळावरील फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. गोविंदा आणि कोमल आगामी ‘रूपा’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. सुनीता यांनी यावेळी सूचक प्रतिक्रिया देत गोविंदावर टीका केली. याआधी सुनीता आहुजा यांनी एका मुलाखतीत गोविंदाचे ‘कोमल’ नावाच्या महिलेबरोबर अफेअर असल्याचा दावा केला होता. नुकतंच पापाराझींनी गोविंदा आणि कोमल यांच्याबाबत सुनीता यांना विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “विनाशकाले विपरीत बुद्धी’ ही म्हण ऐकली आहे ना? त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. म्हणूनच तो हे सगळं करतोय.” यानंतर पापाराझींनी गोविंदाला चिटर नंबर १ म्हटलं जात असल्याचं सांगितल्यावर सुनीता म्हणाल्या की, “याचं उत्तर गोविंदाचे चाहते आणि माध्यमांनी द्यावं मी काही बोलले तर मला ट्रोल केलं जातं.”

अफेअरच्या चर्चांवर गोविंदा काय म्हणाला?

गोविंदाच्या कथित अफेअरबाबतच्या चर्चांवर खुद्द अभिनेत्यानेही प्रतिक्रिया दिली. सुनीता आहुजा यांनी गोविंदाचे एकापेक्षा अधिक महिलांबरोबर अफेअर असल्याचे आरोप केल्यानंतर एएनआयला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने याबाबत भाष्य केलं. गोविंदा म्हणाला होता, “मी वयाच्या ३४ वर्षांपर्यंत इतका निरागस होतो की, मी इतका निरागस का होतो याची मलाच लाज वाटते.” पुढे अफेअरच्या चर्चेवर भाष्य करताना तो म्हणाला, “तुम्ही मिठाईच्या दुकानात राहूनही भुकेले बाहेर पडलात, तर त्यापेक्षा दुःखाची गोष्ट काय असेल?”.