Govinda Sunita Ahuja Rakshabandhan Family Photo: बॉलीवूड अभिनेता गोविंदा हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा हे त्यांच्या वैवाहिक नात्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र आता तो मागे घेण्यात आला आहे. घटस्फोटाची याचिका मागे घेण्यात आली असली तरी कौटुंबिक फोटोतून गोविंदा गायब असल्याचं दिसून आलं आहे.
रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने कलाकारांनी त्यांच्या कुटुंबासह सण साजरा करत सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. टीना आहुजाने सोशल मीडियावर रक्षाबंधनाचे फोटो शेअर केले. यामध्ये टीनाने कृष्णा अभिषेक व कश्मिरा शाह यांच्याबरोबर सण साजरा केल्याचे दिसून आले. यातील एका फोटोमध्ये सुनीता आहुजासुद्धा दिसून आल्या, मात्र या फॅमिली फोटोमध्ये गोविंदा न दिसल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
फोटोमध्ये गोविंदा नसल्यानं नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आश्चर्य
टीना आहुजाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत आमचे रक्षाबंधन सणाचे सेलिब्रेशन या कॅप्शनसह फोटो शेअर केले. यामध्ये आरती सिंह, कृष्णा अभिषेक, यशवर्धन आहुजा आणि टीना यांनी रक्षाबंधन केल्याचं दिसून आलं. पण, फोटोमध्ये गोविंदा नसल्यानं नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. सुनीता यांच्याबरोबर सध्या सुरू असलेल्या वादांवर आणि एकमेकांबद्दल पापाराझींसमोर केलेल्या वक्तव्यांनंतर गोविंदाने कुटुंबाबरोबर सण साजरा न केल्याचं अनेकांच्या लक्षात आलं आहे.
सोशल मीडियावर या फोटोवर एका नेटकऱ्यानं लिहिलं, “खूप सुंदर फोटो आहे. घरातील हे सर्वजण गोविंदाला नक्कीच चांगलं ओळखत असणार. त्याला कुटुंबाची गरजच नसेल तर काय करणार…?” आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं, “आमचा सुनीता आहुजांना पूर्ण पाठिंबा आहे, कारण फक्त एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचं मन समजू शकते; त्या कोणत्या परिस्थितीतून सध्या जात असतील याची मला जाणीव आहे.”
दरम्यान, गोविंदावर त्याची पत्नी सुनीता आहुजा यांनी अनेकदा विवाहबाह्य संबंधांचे आरोप केले आहेत. कोमल राणी स्वर्णकारबरोबर गोविंदा दिसत असल्यानं त्यांनी पापाराझींसमोर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर गोविंदाने सार्वजनिकरीत्या कोणतीही वक्तव्यं करताना मर्यादा राखण्याचा इशारा दिला होता. आता सुनीता आहुजा यांनी घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याचे गोविंदाच्या मॅनेजरने जाहीर केलं असलं तरी अजूनही गोविंदा कुटुंबाबरोबर सण साजरा करत नसल्याचे दिसून आले.
घरची गोष्ट घरातच राहिली पाहिजे – कृष्णा अभिषेक
गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेकने गोविंदा-सुनीताच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणालेला, “घरची गोष्ट घरातच राहिली पाहिजे, इतर लोक याबद्दल इतकं बोलत आहेत हे मला अजिबात आवडत नाही. कशासाठी बोलत आहेत हेच कळत नाही. ते माझे मामा आहेत, त्यामुळे मी या विषयावर कधीही काही बोलणार नाही. माझं माझ्या मामीवर खूप प्रेम आहे आणि मामांवरही प्रेम आहे. फक्त देवाकडे प्रार्थना करतो की सगळं लवकर सुरळीत व्हावं.”
