Govinda on Neelam Kothari : बॉलीवूडचा एक काळ गाजवलेला अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा हे चर्चेत आले आहेत. गोविंदा व कोमल राणी स्वर्णकार यांच्या कथित अफेअरवरून सुनीता आहुजा यांनी पापाराझींसमोर संताप व्यक्त केल्यानं नवीन वादाला सुरुवात झाली. या वादामुळे गोविंदाचे खासगी आयुष्य चर्चेत आले असून, त्याच्या नीलम कोठारीबरोबरच्या रिलेशनशिपच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत.
गोविंदा व कोमल राणी स्वर्णकार यांच्या नात्याबाबतच्या चर्चा
गोविंदाच्या चित्रपटांबरोबरच त्याचे वैयक्तिक आयुष्य नेहमी चर्चेमध्ये राहिले आहे. यापूर्वी सुनीता आहुजाने अनेकदा गोविंदाचे अफेअर असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा गोविंदा व कोमल राणी स्वर्णकार यांच्या नात्याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. असा एक काळ असा होता जेव्हा, बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या नीलम कोठारीवर गोविंदाचे प्रेम जडले होते. १९९० साली ‘स्टारडस्ट’ला दिलेल्या एका मुलाखतीत, गोविंदाने नीलम कोठारीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
मला नीलमबरोबर लग्न करायचं होतं – गोविंदा
गोविंदाने नीलम कोठारीबद्दल प्रेम व्यक्त केले होते. तो म्हणाला होता, “आमची खूप वेळा भेट व्हायची आणि जसजसं मी तिला ओळखत गेलो, तसतशी ती मला अजून जास्त आवडू लागली. ती इतकी प्रेमळ होती की, कोणताही पुरुष तिच्या प्रेमात पडेल. मी माझा सुनीताबरोबरचा साखरपुडा मोडला होता. कारण- मला नीलमबरोबर लग्न करायचं होतं. मला वाटत नाही की, त्यामध्ये काही चुकीचं होतं.”
पुढे गोविंदा म्हणाला, “मी तिचं कौतुक करणं थांबवू शकत नव्हतो. माझ्या मित्रांमध्ये, कुटुंबीयांमध्ये, अगदी माझं जिच्याबरोबर लग्न ठरलं होतं, त्या सुनीतासमोरही मी नीलमचं कौतुक करायचो. मी सुनीताला स्वतःमध्ये बदल कर आणि नीलमसारखी हो, असं सांगायचो.“ तसेच, ”तिच्याकडून शिक, असंही सांगायचो. मी खूप कठोर वागत होतो,” अशी कबुलीही गोविंदाने दिली होती.
गोविंदा व सुनीता यांच्यामध्ये वाद
दरम्यान, गोविंदाने आईच्या शब्दासाठी सुनीता आहुजाबरोबर लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. काही वर्षांपासून सुनीता व गोविंदा यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे ते चर्चेत आले आहेत. सुनीता लॉक अप या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती; पण गोविंदाने त्यातून तिला स्वतः येऊन शोमधून बाहेर नेले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा सुनीताने कोमल राणी स्वर्णकारबरोबर गोविंदाचे अफेअर असल्याचा आरोप केला आहे.
