Govinda on Bollywood Controversies : कलाकार म्हटलं की, संघर्ष, ट्रोलिंग हेसुद्धा लोकप्रियतेबरोबर येतंच. अनेकदा आपल्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही ते चर्चेत असतात. अनेकदा खासगी गोष्टींमुळे त्यांना टीकेला सामोरं जावं लागतं आणि याचा बऱ्याचदा त्यांच्या कामावरही परिणाम होतो. असंच काहीसं घडलंय बॉलीवूडमधील ९० च्या काळातील लोकप्रिय अभिनेता गोविंदाबरोबर.
गोविंदाबद्दल हल्ली खूप काही बोललं जातं. एकेकाळी आपल्या अभिनय आणि नृत्याच्या हटके स्टाईलने अनेकांची मनं जिंकत घराघरात पोहोचलेला गोविंदा आता अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतो आणि त्याच्याबद्दल खूप काही बोललंही जातं. अशातच आता गोविंदानं याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.
गोविंदा काय म्हणाला?
गोविंदानं यावेळी अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, आमिर खान या मंडळींचं उदाहरण देत इंडस्ट्रीत नेहमीच अनेकांचं नाव खराब करण्याचा प्रयत्न झाला आहे, असं म्हटलं आहे. अभिनेता म्हणाला, “या इंडस्ट्रीमध्ये कायम अनेक कलाकारांबद्दल बोललं गेलं आहे, त्यांची नावंही खराब करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तुम्ही अमिताभ बच्चन यांच्याकडेच बघा. ते पण चांगले अभिनेते आहेत; पण मधली १०-१५ वर्षे ते कुठेच नव्हते. याचा अर्थ तेसुद्धा वेळेवर शूटिंगला जायचे नाहीत, असा होतो का? राजेश खन्ना यांच्याबरोबरही तसंच घडलं. करिअरच्या मधल्या काळात त्यांच्याबद्दल खूप काही बोललं गेलं. प्रत्येकाला यातून जावं लागतं. तुम्ही त्यातून बाहेर कसे आलात हे महत्त्वाचं ठरतं.”
गोविंदा पुढे आमिर खानचं उदाहरण देत म्हणाला, “आमिर खानचं मधल्या काळात नाव खराब करण्याचा किती प्रयत्न झाला. पण, जेव्हा तो हिट चित्रपट द्यायला लागला तेव्हा सगळ्यांच्या नजरेत परफेक्शनिस्ट झाला. या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणाचं नाव अगदी स्वच्छ आहे? तुम्ही वेडे आहात का? इथे कोणाचं नाव पूर्णपणे परफेक्ट आहे? ज्यांचं नाव खूपच चांगलं आहे, लक्षात घ्या की, तेच लोक सर्वांत धोकादायक असतात. ज्यांच्यावर लोक खूप प्रेम करतात, त्यांनाच लोक घाबरतात. माफ करा, इथे खरंच कोणाचं नाव पूर्णपणे चांगलं आहे?” तो पुढे म्हणाला: “एक गोष्ट नक्की आहे की, तुमचं नाव कधीतरी बदनाम होणारच.”
दरम्यान, अनेकदा गोविंदाच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल समाजमाध्यमांमध्ये चर्चा होत असते.गोविंदाच्या पत्नी सुनीता आहुजादेखील अनेकदा त्याबद्दल आणि त्यांच्या वैवाहिक जीवनातील समस्यांबद्दल बोलताना दिसतात.
