Govinda Reaction On Wife Sunita Ahuja Allegations: गोविंदा हा अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याची पत्नी सुनीता आहुजा यांनी केलेली वक्तव्ये लक्ष वेधून घेतात. सुनीता आहुजा या विविध मुलाखती, तसेच त्यांच्या यूट्यूब चॅनेलवरही त्या अनेक गोष्टींबाबत खुलासे करतात. त्यांच्या वक्तव्यांची चर्चा होताना दिसते.
सुनीता आहुजा यांनी अनेक मुलाखतींमध्ये गोविंदा आणि त्यांच्या नात्याबद्दल, लग्नाबद्दल तसेच गोविंदाच्या अफेअरबद्दल वक्तव्य केले आहे. तसेच, गोविंदाला सध्या बॉलीवूडमध्ये काम का मिळत नाही, याबरोबरच गोविंदाने त्याच्या मुलांना काम देण्यासाठी कोणतीही मदत केली नाही. तसेच तू तुझ्या वडिलांसारखा होऊ नकोस, असेही त्या म्हणाल्या होत्या.
“जेव्हा मी राजकारणातून बाहेर…”
आता गोविंदाने या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. अभिनेत्याने नुकताच एएनआयशी संवाद साधला. त्यावेळी त्याला विचारण्यात आले की, आम्ही अक्षय कुमार, सलमान खान तसेच इतर कलाकारांच्या मुलाखती ऐकल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही त्यांना करिअरमध्ये खूप मदत केली होती. पण, तुम्ही तुमच्या मुलाला त्याच्या करिअरमध्ये काहीच मदत केली नाही, असा आरोप तुमच्या पत्नी तुमच्यावर करत आहेत.
या प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेता म्हणाला, “जेव्हा मी राजकारणातून बाहेर पडलो, त्यावेळी मी विचार केला की, माझी स्पर्धा, द्वेष, ईर्षा यांमुळे कोणालाही त्रास होऊ नये. खासकरून माझ्या मुलांना त्रास होऊ नये. त्यामुळे मी राजकारणातून बाहेर पडलो. मी माझ्या कुटुंबासाठी, परिवारासाठीच राजकारणातून बाहेर पडलो.”
पुढे गोविंदा म्हणाला, “मी साजिद नाडियादवाला यांना यशला मदत करण्यासाठी सांगितले. चित्रपट कसे बनतात, कसे काम केले जाते आणि अभिनय क्षेत्रातील गोष्टी समजून घेण्यासाठी त्यांनी त्याला त्यांची केबिन दिली.”
गोविंदा असेही म्हणाला, “करिअरच्या बाबतीत घरात मला फारसे विचारले गेले नाही. मी चित्रपटांत अपयशी ठरलो आहे, असे वातावरण घरात निर्माण झाले होते. माझी देवाकडे प्रार्थना आहे की, मुलांसाठी काहीतरी करण्याची संधी मिळावी. माझ्याच घरी माझ्याबद्दल असा विचार होत असेल, तर मी कुठे जाईन. मी १८ नवीन दिग्दर्शक चित्रपटसृष्टीत आणले आहेत. १९-२० निर्माते आणले आहेत. जवळजवळ १२ नवीन कलाकार आणले आहेत. जेव्हाही मला देवाने संधी दिली तेव्हा मी माझे काम केले आहे. यावर मी आणखी चर्चा करणार नाही.ते माझा अपमान झाल्यासारखे मला वाटेल.”
यशबद्दल गोविंदा म्हणाला की, यश माझ्यापेक्षाही उत्तम अभिनेता होईल. मी आशा करतो की, जर त्याला उत्तम भूमिका दिल्या गेल्या, तर तो उत्तम अभिनेता होईल.
दरम्यान, गोविंदादेखील लवकरच पुन्हा एकदा चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार असल्याचे म्हटले जात आहे.
