गोविंदाने अनेकदा सांगितलं आहे की, त्याच्यापेक्षा लहान आणि त्याच्या वयाच्या कलाकारांच्या तुलनेत त्याने दिलीप कुमार, राजेश खन्ना, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन आणि देव आनंद यांसारख्या ज्येष्ठ आणि दिग्गज कलाकारांबरोबर सेटवर सर्वाधिक वेळ घालवला. विशेष म्हणजे, या दिग्गज कलाकारांनीही गोविंदाची नेहमी काळजी घेतली.

दिलीप कुमार यांनी गोविंदाला मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी तब्बल २५ चित्रपट सोडण्याचा सल्ला दिला होता, तर देव आनंद यांनी त्याच्या खासगी आयुष्यातील गोष्टी सार्वजनिक होऊ नयेत, यासाठी त्याला मदत केली होती.

देव आनंद यांनी गोविंदाच्या कर्मचाऱ्यांसाठी बंगले का खरेदी केले?

गोविंदाने एएनआयशी संवाद साधताना एक जुना किस्सा सांगताना म्हटलं, “एकदा देव साहेब माझ्याकडे आले आणि म्हणाले, गोविंदा, तुझे ड्रायव्हर तुझ्या खासगी आयुष्याची माहिती बाहेर सांगतात आणि तुझी बदनामी करतात. या चौघांनाही कामावरून काढून टाक.” त्यावर गोविंदाने देव आनंद यांना सांगितलं की, या गाडी चालकांना कुटुंबं आणि मुलं आहेत. त्यामुळे त्यांना नोकरीवरून काढलं तर ते माझं वाईट व्हावं असा विचार करतील. यानंतर देव आनंद यांनी गोविंदाला त्या चार गाडी चालकांना बोलवण्यास सांगितलं आणि त्यांना थेट विचारलं, “गोविंदाने असं काय करावं, ज्यामुळे तुम्ही त्याचं वाईट चिंतणार नाही?”

गोविंदाने पुढे सांगितलं की, देव आनंद यांनी त्या चौघांना नोकरीवरून काढल्यानंतर त्यांची भरपाई म्हणून बंगल्यासारखी घरं खरेदी करून देण्याची व्यवस्था केली. गोविंदा हसत हा किस्सा सांगताना म्हणाला, “माझी एक सहअभिनेत्री एका परिसरात घर शोधण्यासाठी गेली होती. तिथे तिला माझा स्पॉटबॉय दिसला. तेव्हा ती म्हणाली, आई, आपण इथे राहायला नको. गोविंदाचा स्पॉटबॉय इथे राहतोय”. हा किस्सा सांगताना गोविंदांना हसू आवरलं नाही. गोविंदाने देव आनंद यांचा सल्ला मनावर घेतला. तो म्हणाला, “मी नेहमी माझ्यापेक्षा ज्येष्ठ कलाकारांबरोबर वेळ घालवला आहे. मी कधीही तरुण कलाकारांशी मैत्री केली नाही. मी रात्री कधी पार्टीही केली नाही. खरं तर, तसं करण्यासाठी मला कधी वेळच मिळाला नाही.” मात्र, ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्नांप्रमाणेच गोविंदाही चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवर प्रचंड उशिरा पोहोचण्यासाठी ओळखला जायचा. सेटवर उशीरा पोहोचण्याचे किस्से त्यावेळी बॉलिवूडमध्ये चांगलेच चर्चेत होते.

गोविंदाने सांगितलं की, दिवसाला चार ते पाच शिफ्टमध्ये काम करत असल्यामुळे सेटवर वेळेवर पोहोचण्याची शक्यताच नव्हती. तो म्हणाला, “मी एकटाच इतक्या शिफ्टमध्ये काम करत नव्हतो. मला इतक्या शिफ्ट करायला कोणी जबरदस्ती केली नव्हती. लोक स्वतः माझ्याकडे यायचे आणि माझ्याबरोबर काम करण्याचा आग्रह करायचे. माझं वेळापत्रक ते कसंही सांभाळून घेतील, असं आश्वासनही द्यायचे; पण शेवटी ते तसं करू शकले नाहीत.” गोविंदाने पुढे सांगितलं की, तो सेटवर उशिरा पोहोचत असल्यामुळे दिवसाच्या हिशोबाने मानधन घेणाऱ्या त्याच्या सहकलाकारांनाही त्याचा फायदा झाला.

तो म्हणाला, “मी कादर खान यांच्यासोबत ४३ चित्रपट केले आहेत आणि शक्ती कपूर यांच्यासोबत ४२ चित्रपट केले आहेत. सुरुवातीला फ्लॅटमध्ये राहणारे हे सगळे कलाकार नंतर बंगले घेण्याइतके सक्षम झाले. त्यामुळे त्यांच्या घरातील आणि कुटुंबातील सगळ्या गोष्टी सुरळीत चालल्या. त्यावेळी त्या सर्वांनी पैसे कमावले आणि करिअरही चांगलं झालं”. गोविंदाने पुढे असंही स्पष्ट केलं की, वेळेचं भान ठेवणं ही चांगली सवय आहे; मात्र त्यासाठी आरोग्य धोक्यात घालणं योग्य नाही. तो हसत म्हणाला, “तुमची प्रकृती चांगली असेल तर वेळेवर येणं चांगलंच आहे. पण जर तुमची प्रकृती ठीक नसेल, तर मग प्रत्येकजण गोविंदा बनेल.”