Govinda on David Dhawan: चित्रपटात सतत एकत्र काम करणाऱ्या कलाकारांच्या जोड्या जशा लोकप्रिय होतात. तशाच दिग्दर्शक आणि कलाकारांच्या जोड्यादेखील लोकप्रिय होतात. गोविंदा व डेव्हिड धवन यांची जोडी ही त्यापैकीच एक आहे.

९० च्या दशकात बॉलीवूडला एकापाठोपाठ एक हिट सिनेमा देणारे म्हणून गोविंदा आणि डेव्हिड धवन यांची जोडी ओळखली जात होती. एक यशस्वी अभिनेता-दिग्दर्शक जोडी म्हणून त्यांच्या जोडीला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. ‘राजा बाबू’ ‘कुली नं. १’ पासून ते ‘हिरो नं. १’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ असे त्यांचे अनेक सिनेमे गाजले. विनोदी शैली, एकापेक्षा एक गाणी, गोविंदाच्या अचूक विनोदी टायमिंगमुळे हे चित्रपट खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले. त्यांनी १७ चित्रपट एकत्र केले; पण त्यानंतर मात्र या जोडीने पुन्हा एकत्र काम केले नाही. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यामागे काय कारण होते, याचा खुलासा गोविंदाने केला आहे.

“आम्ही एकत्र १७ चित्रपट…”

गोविंदाने नुकतीच एएनआयला मुलाखत दिली. या मुलाखतीत गोविंदा म्हणाला, “आम्ही एकत्र १७ चित्रपट केले. ज्या क्षणी डेव्हिड धवन यांना वाटले की, ते आता माझ्याबरोबर काम करू शकत नाहीत. त्यावेळी त्यांनी माझ्याबरोबर काम करणे थांबवले. भविष्यातही मला त्यांच्याबरोबर काम करायचे होते. मला वाटत होते की, आम्ही १८ वा आणि १९ वा चित्रपट एकत्र करावा; पण त्यांना तसे वाटत नव्हते.”

जरी व्यावसायिकदृष्ट्या त्यांचे नाते संपले तरी त्यांच्यातील वैयक्तिक नाते चांगले आहे, असेही गोविंदा म्हणाला. तो म्हणाला, “मी अनेकदा डेव्हिड धवन यांच्यावर नाराज व्हायचो. मी त्यांना फोन करायचो आणि त्यांना समजायचे. आजसुद्धा जेव्हा माझी गोष्ट निघते, तेव्हा ते रडू लागतात. ते एक चांगले व्यक्ती आहेत.”

डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केलेला है जवानी तो इश्क होना ही है हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर डेव्हिड धवन यांना संपर्क केल्याचे अभिनेत्याने सांगितले.

याच मुलाखतीत गोविंदाने दिवंगत अभिनेते कादर खान यांचे कौतुक केले. तसेच, त्याने पत्नी सुनीता आहुजा, तिने केलेले आरोप अशा अनेक गोष्टींबद्दलही वक्तव्य केले.

दरम्यान, गोविंदा लवकरच एका नवीन सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रूपा असे या सिनेमाचे नाव आहे. आता हा सिनेमा प्रेक्षकांना पसंत पडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.