Govinda Talks About Salman Khan :गोविंदा ९०च्या काळातील बॉलीवूडमधील हिट ठरलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनेत्याने त्याच्या हटके अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ९०च्या काळात त्याने अनेक लोकप्रिय कलाकारांसह काम करत हिट चित्रपट दिले, यापैकी एक म्हणजे बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खान.

सलमान खान व गोविंदा यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. दोघांची ऑनस्क्रीन मैत्रीसुद्धा अनेकांना आवडायची. अशातच आता गोविंदाने सलमान खानबद्दल बोलताना त्याला सल्ला दिला आहे. गोविंदा कुठल्या न कुठल्या कारणामुळे नेहमी चर्चेत असतो. अशातच आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तो सलमान खानबद्दल बोलला असून यामुळे तो पु्न्हा चर्चेत आला आहे.

गोविंदाने सलमान खानला दिलेला सल्ला

सिद्धार्थ कन्ननशी संवाद साधताना त्याने ‘पार्टनर’ चित्रपटातील सलमान खानच्या ट्रान्सफॉर्मेशनची कल्पना त्याची होती याबद्दल सांगितलं आहे. या चित्रपटातून त्याने पहिल्यांदाच सलमान खानबरोबर काम केलेलं आणि हा चित्रपटही हिट ठरला होता. यापूर्वी गोविंदाने डेविड धवनच्या अनेक चित्रपटांत काम केलं आहे. गोविंदाला सलमान खानबरोबरच्या नात्याबद्दल विचारल्यानंतर तो म्हणाला, “तो खूप चांगला मुलगा आहे. तो मला विचारायचा की काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. मी त्याला म्हटलं थोडासा चेहरा उतरला आहे, बॉडी बनव, केस पण कमी झाले आहेत त्याचं काहीतरी कर. तो गेला आणि त्यावर काम केलं. त्यानंतर त्याचा लूक बदलला. ‘पार्टनर’च्या आधीचा गोविंदा आणि नंतरचा यामध्ये फरक आहे.”

Award Banner

गोविंदाने यावेळी त्याने सांगितल्यानंतरच सलमान खान व्यायाम करायला लागला असं म्हटलं आहे. ‘लेहेरे रेट्रो’शी संवाद साधताना पूर्वी सलमान खाननेही ‘पार्टनर’ चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिलेली. तो म्हणाला, “आम्ही एकमेकांबद्दलच्या प्रेमापोटी काम केलं. सुरुवातीला मला गोविंदाबरोबर काम करायला भीती वाटायची. एखादी व्यक्ती चित्रपटात इतकी विनोदी कशी असू शकते असा मी विचार करायचो. १७ वर्षांच्या माझ्या करिअरमध्ये मी कायम त्याच्याबरोबर काम करायला घाबरायचो.”

‘पिंकव्हिला’शी संवाद साधताना निर्माते पहलाज निहलानी यांनी ‘पार्टनर’ चित्रपटानंतर गोविंदाचं आयुष्य पूर्ण बदललं, सगळं त्याच्या विरोधात घडत गेलं असं म्हटलेलं. ते म्हणालेले, “पार्टनरनंतर सगळं त्याच्याविरोधात घडू लागलं. त्याला एकही चित्रपट मिळाला नाही. त्याचे अनेक मोठे चित्रपट डब्यात गेले.” डेविड धवन दिग्दर्शित ‘पार्टनर’ चित्रपटात सलमान खान, गोविंदा यांच्यासह लारा दत्ता आणि कतरीना कैफही झळकलेले.