Govinda Sunita Ahuja Baby Daughter Death : बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वाद चर्चेत आला आहे. सुनीताने कोमल राणी स्वर्णकार व गोविंदा यांच्यावर कथित अफेअरचे आरोप केले आहेत. गोविंदा व सुनीता या दोघांमधील वैवाहिक वाद चर्चेत असताना त्यांचा काही वर्षांपूर्वीचा एक भावुक किस्सा पुन्हा एकदा समोर आला आहे. गोविंदा व सुनीता यांच्या एका चिमुकल्या मुलीचं निधन झालं होतं.

गोविंदा व सुनीता यांनी १९८७ मध्ये लग्न केलं असून त्यांना दोन मुलं आहेत. गोविंदाच्या करिअरमुळे दोन वर्षे त्यांनी लग्न झाल्याचं लपवलं होतं. १९८९ मध्ये त्यांना पहिली मुलगी टीना झाल्यानंतर गोविंदा व सुनीता यांनी लग्न केल्याचा खुलासा केला होता. पण, त्यानंतर दोघांच्या आयुष्यामध्ये अत्यंत कठीण काळ आला होता. १९९७ मध्ये त्यांना आणखी एक मुलगी झाली होती; पण अवघ्या तीन महिन्यांमध्ये तिचे निधन झालं होतं. दुसऱ्या अपत्याला गमावण्याचा तो काळ आयुष्यातील सर्वांत कठीण प्रसंग असल्याचं सुनीता यांनी सांगितलं होतं.

गोविंदा व सुनीताच्या चिमुकल्या मुलीचं झालेलं निधन

उषा काकडे यांच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीमध्ये सुनीता आहुजा यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलीचा उल्लेख केला होता. या मुलाखतीमध्ये त्यांना आयुष्यातील सर्वांत कठीण काळाबद्दल विचारण्यात आलं. यावर त्यांनी कोणताही विचार न करता मुलीला गमावल्याची आठवण सांगितली होती. सुनीता म्हणालेल्या, “मला दुसऱ्यांदा झालेली मुलगी ९ महिन्यांच्या आधीच झाली होती, त्यामुळे तिची पूर्णपणे वाढ झालेली नव्हती, तिचं फुप्फुस पूर्णपणे विकसित झालं नव्हतं.”

पुढे त्या म्हणाल्या, “तिला फुप्फुसांचा त्रास असल्याने एका रात्री तिची तब्येत बिघडली. तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि माझ्या कुशीतच तिचा मृत्यू झाला. त्यावेळीस माझी मुलगी फक्त तीन महिन्यांची होती. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण काळ होता. ते बाळ नीट राहिलं असतं तर आज मला दोन मुली आणि एक मुलगा असला असता.”

सुनीता यांनी यापूर्वी हॉटरफ्लाईला दिलेल्या मुलाखतीतही या दुःखद प्रसंगाबद्दल सांगितलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, “ती प्रीमॅच्युअर होती, आठव्या महिन्यात तिचा जन्म झाला होता. कारण त्यावेळी मी गोविंदाबरोबर खूप प्रवास करत होते. मला याबद्दल माहिती नव्हती. माझी पहिली प्रसूती अगदी सहज झाली होती, त्यामुळे दुसरीही तशीच होईल असं मला वाटलं. वजन उचलू नये हे मला माहीत नव्हतं.”

या दुःखद घटनेनंतर सुनीता आणि गोविंदा यांच्या आयुष्यात पुन्हा आनंदाची चाहूल लागली. त्यांच्या आयुष्यात गोंडस मुलाचं आगमन झालं. पण मुलगा यशवर्धनच्या जन्मावेळी सुनीता यांचं वजन खूप वाढल्याचं त्यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं. सुनीता म्हणाल्या, “माझा मुलगा यशच्या जन्मावेळी माझं वजन १०० किलो होतं. माझं वजन खूप वाढलं होतं. मला वाटत होतं की मी मरेन. मला त्या अवस्थेत पाहून चीची (गोविंदा) रडू लागला होता,”

आयुष्यातील सर्वांत वेदनादायी अनुभव – गोविंदा

एका जुन्या मुलाखतीमध्ये गोविंदाने या दुःखद अनुभवाच्या आठवणी सांगितल्या होत्या. गोविंदाच्या आईने त्याला त्यांच्या मुलीचा मृतदेह नर्मदा नदीत विसर्जित करण्यास सांगितला होता. स्वतःच्याच मुलीला असं घेऊन जाणं हा त्याच्या आयुष्यातील सर्वांत वेदनादायी अनुभवांपैकी एक असल्याचं गोविंदानं सांगितलं होतं.