Sunita Ahuja Bandra Family Court Viral Video : बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये वाद सुरू आहेत. अनेक दिवसांपासून गोविंदा व सुनीता हे वेगळे होणार असून, ते घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा आहेत. अनेकदा सुनीता यांनी गोविंदाचं बाहेर अफेअर असल्याची वक्तव्यं केली आहेत. त्यानंतर आता सुनीता आहुजा या वांद्रे कौटुंबिक न्यायालयातून बाहेर पडताना दिसून आल्या आहेत.
सुनीता आहुजा यांचा कौटुंबिक न्यायालयातून बाहेर पडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा यशवर्धन आहुजा असल्याचे दिसून आले. न्यायालयाबाहेर पापाराझींची गर्दी झाल्यानंतर सुनीता या गर्दीतून बाहेर पडत गाडीमध्ये बसल्याचे दिसून आल्या. यावेळी त्यांनी गुलाबी रंगाचा शर्ट स्टाईल केला होता. यशवर्धनने पापाराझींना बाजूला करून, त्याच्या आईला रस्ता करून दिल्याचे दिसून आले.
वाढदिवस साजरा करण्यासाठी न्यायालयात – सुनीता आहुजा
सुनीता आहुजा यांना पापाराझींनी न्यायालयाच्या बाहेर आल्याबद्दल प्रश्न विचारले. यावेळी अनेकदा गोविंदासंदर्भात प्रश्न विचारल्याने त्या चिडलेल्या दिसून आल्या. यावेळी त्यांनी पापाराझींवर नाराजी व्यक्त करीत, वाढदिवस साजरा करण्यासाठी न्यायालयामध्ये आल्याचं म्हणाल्या आहेत. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सुनीता आहुजा घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात आल्याचा अंदाज व्यक्त केला होता.
काय म्हणाले गोविंदाचे मॅनेजर?
दोन वर्षांपासून गोविंदा व सुनीता वेगळे होणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, यावेळी त्या घटस्फोट घेण्यासाठी नाही, तर घटस्फोटाचा अर्ज मागे घेण्यासाठी न्यायालयात आल्याची माहिती गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी दिली आहे. सुनीता आहुजा यांनी घटस्फोटाचा अर्ज मागे घेतल्याचं मॅनेजरने सांगितलं आहे. शशी सिन्हा म्हणाले की, त्यांनी घटस्फोट मागे घेण्यासाठी अर्ज केला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. पण, दीड-दोन वर्षांपासून माध्यमांमध्ये या प्रकरणाचा जो प्रकार सुरू होता, त्याची खरं तर गरज नव्हती. बदनामी होण्यापासूनही वाचता आलं असतं. प्रत्येकाच्या घरामध्ये भांडणं असतात; पण अशी प्रकरणं कोर्टात गेली की, सगळ्यांना त्याबद्दल कळतं. घरातील गोष्टी घरातच राहून चर्चा करून सोडवता आल्या असत्या.”
गोविंदा, सुनीता आणि मुलं सर्वांचं चांगलं होऊ दे – शशी सिन्हा
पुढे शशी सिन्हा म्हणाले, “केस मागे घ्यायची होती, तर ती दाखलच का केली? या गोष्टीचं मला दुःख झालं; पण सध्या यावर गोविंदा यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आताच दोन मिनिटांपूर्वी या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे इतक्या लवकर प्रतिक्रिया देण्याची काय गरज आहे? सध्या कोणतीही प्रतिक्रिया नाही. गोविंदा, सुनीता आणि मुलं सर्वांचं चांगलं होऊ दे, देव सगळ्यांना सद्बुद्धी देवो.”
दरम्यान, गोविंदा व सुनीता आहुजा यांचे १९८७ मध्ये लग्न झाले. त्यांना टीना नावाची मुलगी व यशवर्धन नावाचा मुलगा अशी दोन अपत्यं आहेत. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, डिसेंबर २०२४ मध्ये वांद्रे येथील कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. त्यानंतर दोघांमधील वाद अनेकदा चर्चेत राहिले. काही दिवसांपूर्वी सुनीता यांनी गोविंदा हा कोमल राणी स्वर्णकारबरोबर फिरत असल्याने त्यावर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.
