Govinda on Marriage with Sunita Ahuja: गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा सतत विविध कारणांमुळे चर्चेत असतात. सुनीता आहुजा यांनी अनेकदा मुलाखतींदरम्यान गोविंदाचे अफेअर होते, असे वक्तव्य केले आहे. तसेच, मुलांना करिअरमध्ये तो मदत करत नाही, असेही त्या म्हणाल्या आहेत. बऱ्याचदा त्यांच्या घटस्फोटाबद्दलही चर्चा होताना दिसतात.

आता या सगळ्यात गोविंदाने एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्याची चर्चा होत आहे. एका जुन्या मुलाखतीत अभिनेत्याने अभिनेत्री नीलम कोठारीवर त्याचे प्रेम होते, अशी कबुली दिली होती. तसेच, नीलमबरोबर लग्न करण्याची त्याची इच्छा होती. इतकेच नाही, तर गोविंदाने सुनीता आहुजा यांच्याबरोबर झालेला साखरपुडादेखील मोडला होता; मात्र त्याच्या आईमुळे त्याला हे लग्न करावे लागले.

स्टारडस्ट मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता म्हणाला होता, “मी सुनीताशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मी तिच्याबरोबर प्रामाणिक होतो. नीलमच्या प्रेमात पडल्यानंतरही मी तिला सोडू शकलो नाही. नीलमनं इतक्या कमी वयात इतकं नाव, प्रसिद्धी व संपत्ती मिळवली; पण ती खूप साध्या पद्धतीनं राहत असे. इतकं यश मिळूनही तिचे पाय जमिनीवर असायचे.”

गोविंदाने नीलम कोठारीच्या प्रेमात पडल्यावर सुनीता आहुजा यांना ‘तिच्यासारखी हो’ असा दिला होता सल्ला

“एखादी मुलगी अशी कशी काय राहू शकते, यावर माझा विश्वास बसत नसे. मी तिचे कौतुक करण्यापासून स्वत:ला थांबवू शकत नसे. माझ्या मित्रांजवळ, कुटुंबाजवळ मी सतत तिचे कौतुक करत असे. मी सुनीतासमोरही तिचं अनेकदा कौतुक करत असे. मी सुनीताला स्वतःमध्ये बदल कर आणि नीलमसारखी हो, असे सांगायचो. नीलमकडून शिक, असंही तिला म्हणायचो. मी खूप निर्दयी होतो.”

जेव्हा गोविंदा सुनीता आहुजा यांना नीलमकडून गोष्टी शिक, तिच्यासारखे वाग, असे तुम्ही सांगायचे तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया असायची याबद्दलही अभिनेत्याने खुलासा केला होता. तो म्हणालेला, “सुनीताला राग येत असे. ती चिडत असे. ती म्हणायची की, मी जशी आहे, तशी असल्यामुळे तू माझ्या प्रेमात पडला आहेस. त्यामुळे मला बदलण्याचा प्रयत्न करू नकोस. पण, त्यावेळी मी खूप गोंधळलेला होतो.”

सुनीता आहुजा यांच्याबरोबरच्या नात्याची सुरुवात कशी झाली, याबद्दल अभिनेता म्हणालेला, “सुनीताबरोबर खरंच एका नात्यात मला अडकायचं नव्हतं. मला फक्त एखादी मुलगी बरोबर फिरण्यासाठी पाहिजे होती.”

गोविंदा पुढे म्हणालेला, “तेव्हा मी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली होती. काही चित्रपट साइन केले होते. एके दिवशी माझा मोठा भाऊ कीर्ती माझ्या शूटिंगच्या सेटवर भेटायला आला. तो आला तेव्हा मला एक रोमँटिक सीन करायचा होता; पण तो करण्याची माझी हिंमत होत नव्हती. एखाद्या मुलीला मिठी मारणं हे मला अवघडल्यासारखं वाटत असे. मी अस्वस्थ व्हायचो.”

“माझी अस्वस्थता पाहून माझा भाऊ मला म्हणाला होता की, थोडा रोमान्सचा अनुभव मिळावा म्हणून एखादं अफेअर का करत नाहीस? कमीत कमी मुलीला मिठी कशी मारायची हे तरी शिकशील. त्या काळात माझी सुनीताशी भेट झाली. मी मान्य करतो की, तिच्याबरोबरचं माझं नातं हे मी ठरवून केलेली गोष्ट होती. त्याची मला मोठी किंमत मोजावी लागली.”