Govinda takes a veiled jibe at Sunita Ahuja: गोविंदा व सुनीता आहुजा काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. गोविंदाने एक पत्रकार परिषद घेऊन, तो लवकरच रूपा या सिनेमातून मोठ्या पडद्यावर परतणार असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याने रूपा सिनेमात त्याच्याबरोबर कोमल राणी स्वर्णकार ही अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याचादेखील खुलासा केला.

त्यानंतर कोमल राणी स्वर्णकार आणि गोविंदा मुंबई विमानतळावर एकत्र दिसले होते. त्यानंतर ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले. गोविंदाची पत्नी सुनीता आहुजानेदेखील गोविंदावर टीका केली. मुलीच्या वयाच्या मुलीबरोबर फिरताना त्याला लाज वाटली पाहिजे, असे ती म्हणाली.

तसेच, कोमलच्या लूकवरूनही त्यांनी टीका केली होती. या सगळ्यानंतर गोविंदाने पापाराझींबरोबर बोलताना पत्नीला हद्दीत राहा, असे सांगितले होते. तसेच, देवाच्या कृपेने स्वत:कडे पैसा, प्रसिद्धी असली तरी दुसऱ्यांवर टीका-टिप्पणी करू नये, तसेच शिवीगाळ करू नये, असेही सांगितले होते. त्याबरोबरच गोविंदाने घटस्फोट, रिलेशनशिप आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले होते. आता गोविंदाने पुन्हा एकदा यावर वक्तव्य केले आहे.

गोविंदा नेमकं काय म्हणाला?

गोविंदा नुकत्याच पार पडलेल्या दहीहंडी महोत्सवात सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या. दहीहंडी उत्सवाबद्दल तो म्हणाला, “जेव्हा हा कार्यक्रम होत असतो, तेव्हा तो केवळ एक खेळ नसतो. आपल्या सर्वांना आपल्या देशाचा वारसा पुढे न्यायचा आहे. आपण जागतिक स्तरावर कशी प्रगती करू शकतो, यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे.”

पुढे तो त्याच्याबद्दल होत असलेल्या चर्चांकडे इशारा करीत म्हणाला, “काही गोष्टी हवेत लिहिल्या गेल्या आहेत. मी प्रार्थना करतो की, त्या स्पष्ट व्हाव्यात. गोविंदा त्या स्पष्ट करू शकेल”, म्हणजेच अनेक गोष्टी काल्पनिक आहेत असे गोविंदाने वक्तव्य केले. पुढे तो असेही म्हणाला, “मला तुमच्या पाठिंब्याची आणि मदतीची गरज आहे.”

गोविंदा ‘युथ शक्ती दहीहंडी’ कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी त्याने सुनीता आहुजा किंवा तिने केलेल्या आरोपांबद्दल थेट उत्तर दिले नाही. मात्र, चाहत्यांनी त्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्याने केले.

दरम्यान, गोविंदा लवकरच रूपा आणि दुनियादारी या सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजादेखील बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘हीरो की हिरोईन’, असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमात सुनीता आहुजादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.