Govinda Warns Karan Johar : गोविंदा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. ९० घ्या काळात त्याने‌ अनेक चित्रपटांत काम करत त्याच्या हटके स्टाइलने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे; पण कित्येक वर्षांपासून तो कोणत्याच चित्रपटातून झळकलेला नाही. तर यादरम्यान तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिला आहे.

गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा अभिनेत्यावर अनेकदा तो त्यांचा मुलगा यशला इंडस्ट्रीतील कामं मिळावी यासाठी मदत करत नाही, तसेच त्याचे विवाहबाह्य संबंध आहेत, असे काही आरोप करत असतात. गोविंदाने याबद्दल पूर्वीच स्पष्टीकरण दिले आहे. अशातच आता त्याच्या नावाचा उल्लेख असलेल्या ‘गोविंदा मेरा नाम’ या चित्रपटाबद्दल त्याने भाष्य केले आहे. यावेळी त्याने चित्रपटाचा निर्माता करण जोहरबद्दलही नाराजी व्यक्त करत त्याला ताकीद दिली आहे. ‘एएनआय’शी संवाद साधताना त्याने याबद्दल सांगितले आहे.

नेमकं काय घडलं?

मुलाखतीत गोविंदा म्हणाला, “कोणीतरी माझ्या नावानं चित्रपट बनवला आहे. मला असं वाटतं की, तो करण जोहर आहे. चित्रपटात नवऱ्याच्या प्रेयसीमुळे त्या पती-पत्नीमध्ये भांडणं होतात, असं पाहायला मिळतं. ते एकमेकांवर संशय घ्यायला लागतात. म्हणजे या लोकांनी मुद्दाम जबरदस्तीनं एखाद्याच्या खासगी गोष्टी चित्रपटातून चुकीच्या पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. गोविंदानं करण जोहरवर आरोप करत पुढे त्याला ताकीदही दिली आहे.

करण जोहरबद्दल गोविंदा नेमकं काय म्हणाला?

गोविंदा पुढे म्हणाला, “जर चुकून मला चित्रपटाचे निर्माते भेटले, तर रजनीकांत जसे चित्रपटात गुंडांची धुलाई करतात तशी मी त्यांची धुलाई करेन. मी वचन देतो की, जर मी त्यांना भेटलो तर मी सार्वजणिक ठिकाणी रजनीकांतसारखी ट्रीटमेंट त्यांना देईन. चुकीचं वागू नका. मी विनंती करतो की, प्रत्येक वेळी विनोद करायचा नसतो. तो चांगला वाटत नाही.”

दरम्यान, करण जोहरची निर्मिती असलेल्या ‘गोविंदा मेरा नाम’ या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. त्याने गोविंदा वाघमारे हे पात्र यामध्ये साकारलं आहे, जो बॉलीवूडमध्ये बॅकअप डान्सर म्हणून काम करत असतो; पण त्याला नृत्य दिग्दर्शक व्हायचं असतं, असं पाहायला मिळतं. चित्रपटात भूमी पेडणेकरने त्याच्या पत्नीची गौरीची भूमिका साकारली आहे; पण त्याला त्याच्या बायकोला घटस्फोट देऊन त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर लग्न करायचं होतं. कियारा अडवाणीने ही भूमिका साकारली आहे. परंतु, गोरीला घटस्फोट घ्यायचा नसतो. कारण- तिला गोविंदाकडून दोन कोटी हवे असतात, जे लग्नाच्या वेळी त्याने हुंडा म्हणून घेतलेले असतात.