Govinda Wife Sunita Ahuja : बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदा हा सध्या त्याच्या कुठल्या प्रोजेक्टच्या निमित्ताने चर्चेत नसला तरी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या चर्चा होताना दिसत आहेत. अभिनेत्याची पत्नी सुनीता आहुजा गोविंदाबद्दल आणि त्याच्या खासगी आयुष्याबद्दल काही वक्तव्ये करताना दिसतात.

सुनीता यांनी गोविंदाच्या अफेअरच्या अफवांवर आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल केलेल्या विधानांमुळे गोविंदाला अनेकदा स्पष्टीकरणही द्यावे लागले आहे. एका जुन्या मुलाखतीत सुनीता यांनी त्यांच्या लग्नाबद्दल आणि नात्याबद्दल आपले स्पष्ट मत व्यक्त केले होते. गोविंदा एक उत्तम मुलगा आणि वडील आहे; पण पती म्हणून तो कमी पडला, असे म्हटले होते.

गोविंदाच्या लोकप्रियतेबद्दल आणि त्याच्याभोवती असणाऱ्या महिला चाहत्यांबद्दल विचारले असता सुनीता म्हणालेल्या, “जेव्हा तुमचा तुमच्या पतीवर पूर्ण विश्वास असतो, तेव्हा अशा गोष्टींनी फरक पडत नाही. ९० च्या दशकात एखाद्या हिरोच्या अफेअरबद्दल चर्चा होणे ही सामान्य गोष्ट होती.”

पुढे त्या म्हणाल्या होत्या, “सोशल मीडियावर लोक काहीही बोलत असतात. आपण त्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या घरात काय चाललंय हे पाहणे महत्त्वाचं आहे. जोपर्यंत गोविंदाची आई हयात होती, तोपर्यंत तो खूप चांगला होता. त्यानंतरही त्यानं स्वतःला सांभाळलं आहे.”

“गोविंदा कधीच स्वतःसाठी जगला नाही” : सुनीता आहुजा

अभिषेक व्यास यांनी घेतलेल्या मुलाखतीत सुनीता यांनी पुढे असं म्हटलं होतं, “मी पुन्हा सांगेन की गोविंदा एक चांगला मुलगा आणि भाऊ आहे; पण एक पत्नी म्हणून मला जे हवं होतं, ते मिळालं नाही. मला पार्ट्यांमध्ये जायला, फिरायला, बाहेर जेवायला आवडतं. पण, गोविंदा कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात इतका व्यग्र झाला की, त्यानं स्वतःच्या आयुष्याचा कधी आनंदच घेतला नाही. तो ६० वर्षांचा झाला आहे; पण तो कधीच स्वतःसाठी जगला नाही.”

गोविंदासारखा मुलगा हवाय; पण पती नको : सुनीता आहुजा

त्यानंतर सुनीता भावूक होत म्हणालेल्या, “या गोष्टीचं मला वाईट वाटतं. इतका मोठा सुपरस्टार असूनही त्यानं आयुष्यात काय पाहिलं? काहीच नाही. मी नेहमी म्हणते की, मला गोविंदासारखा मुलगा हवा आहे; पण पती नको. आता इतक्या वर्षांनी या गोष्टीचा पश्चात्ताप करूनही काही अर्थ नाही. आता ४० वर्षं झाली आहेत, त्याला सोडून जाण्याचा विचार करणंही गुन्हा आहे.”

दरम्यान, गोविंदा अन् सुनीता आहुजा यांच्याबद्दल सांगायचे झाले तर, ११ मार्च १९८७ रोजी त्यांचे लग्न झाले. त्यांना टीना आहुजा आणि यशवर्धन आहुजा अशी दोन मुले आहेत.