बॉलीवूड अभिनेता गुलशन देवैया याने ‘कांतारा चॅप्टर १’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. या भूमिकेने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्याला यशच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटाची ऑफरही आली होती. पण गुलशनने हा चित्रपट सोडला. करिअरमध्ये चांगल्या संधी मिळत असल्याने गुलशन आनंदी आहे. तसेच वैयक्तिक आयुष्याबद्दलही आता त्याने मोठा खुलासा केला आहे.

गुलशन देवैयाने २०१२ मध्ये लग्न केलं होतं, पण ८ वर्षांनंतर २०२० मध्ये त्याचा घटस्फोट झाला. गुलशनच्या एक्स पत्नीचं नाव कॅलिरॉय आहे. ती ग्रीक नागरिक आहे. गुलशनने कॅलिरॉयबरोबरच्या नात्याबद्दल एक महत्त्वाची कबुली दिली आहे. गुलशन एक्स पत्नीला पुन्हा डेट करतोय.

मी माझ्या एक्स पत्नीला डेट करतोय – गुलशन देवैया

“मी कपल थेरपी घेतली. ती माझ्यासाठी खूप फायदेशीर ठरली. मी आता माझ्या एक्स पत्नीला डेट करतोय. हे शक्य झालं, कारण मी आत्मपरीक्षण केलं. स्वतःमध्ये बदल केले, मी आणखी परिपक्व झालो. यापैकी बऱ्याच गोष्टी या कपल थेरपीमुळे घडल्या. आम्ही पुन्हा एकत्र आल्यानंतर शक्य तितक्या नियमितपणे ही थेरपी घेण्याचा प्रयत्न करतो,” असं गुलशन देवैयाने स्क्रीनशी बोलताना सांगितलं.

पुन्हा लग्न करण्याबद्दल गुलशन देवैया म्हणाला…

गुलशनचा पुन्हा लग्न करण्याचा विचार आहे का? असं त्याला विचारण्यात आलं. तो म्हणाला, “नक्कीच. जरी मला लग्नात यश आलं नसलं तरी मला माझं वैवाहिक जीवन खूप आवडायचं. मला लग्न ही संकल्पना खूप आवडते. लग्न माझ्यासाठी नाही, असं म्हणणाऱ्यांपैकी मी नाही.”

‘परफेक्ट फॅमिली’मध्ये काम करणाऱ्या गुलशन देवैयाला बाबा होण्याबद्दल विचारण्यात आलं. परफेक्ट फॅमिलीमुळे बाबा होण्याबद्दलचं तुझं मत बदललं का, असं विचारलं असता गुलशन म्हणाला, “मला बाबा व्हायचं नाही. ही माझी निवड आहे. ‘परफेक्ट फॅमिली’मध्येही मी काही बेस्ट बाबा नव्हतो. दहाडमधील देवीलाल एक चांगला बाप होता. किमान त्याला आपल्या अपत्यासाठी जे योग्य आहे ते करण्याच्या जबाबदारीची जाणीव होती.”

दरम्यान, गुलशन व कॅलिरॉय यांची भेट भारतातच झाली होती. “ती भारतात फिरायला आली होती, त्यादरम्यान आम्ही भेटलो आणि प्रेमात पडलो. त्यावेळी ती युकेमध्ये राहत होती. ती ग्रीक नागरिक आहे. आम्हाला एकमेकांशी लग्न करायचं होतं, त्यामुळे आम्ही लग्न केलं,” असं गुलशनने सांगितलं होतं.