Meena Kumari Gulzar Untold Love Story: बॉलीवूडच्या ‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी आणि दिग्गज दिग्दर्शक गुलजार यांच्यातील अनोख्या नात्याची कथा खूप कमी जणांना माहीत आहे. १९६५ मधील ‘बेनझीर’ चित्रपटाच्या सेटवर गुलझार पहिल्यांदा अभिनेत्री मीना कुमारी यांना भेटले होते. तेव्हा त्यांचे सौंदर्य, उर्दू भाषेवरील प्रभुत्व आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व पाहून ते थक्क झाले होते. त्यानंतरच्या काही वर्षांत मीना कुमारी यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आले. यादरम्यान गुलझार आणि मीना कुमारी यांच्यातील मैत्री अधिक घट्ट झाली. त्यांची मैत्री इतकी घट्ट होती की, आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत जेव्हा आजारपणामुळे मीना कुमारी यांना रमझानचे रोजे ठेवणं शक्य नव्हतं, तेव्हा गुलजार यांनी स्वतः रोजे ठेवले होते. तसेच, मीना कुमारी यांच्या निधनानंतर त्यांनी आपल्या अत्यंत मौल्यवान वस्तू गुलजार यांना दिल्या होत्या.
गुलजार यांनी मीना कुमारी यांना पहिल्यांदा १९५३ साली आलेल्या ‘दो बिघा जमीन’ चित्रपटाच्या वेळी पाहिलं होतं. मीना कुमारी फक्त भूमिका साकारायच्या नाही तर जगायच्या, असं म्हणत त्यांनी अभिनेत्रीचं कौतुक केलं होतं. त्यानंतरच्या काळात ‘साहिब बीबी और गुलाम’, ‘आरती’ आणि ‘मै चुप रहूंगी’ यांसारख्या चित्रपटांमधील उत्कृष्ट अभिनयामुळे मीना कुमारी यांना हिंदी सिनेमाची ‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून ओळखलं जाऊ लागले. मात्र, त्यांच्या चित्रपटांइतकीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा रंगू लागली.
मीना कुमारी यांच्याबद्दल पसरल्या अफवा
दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्याबरोबरचं त्यांचं वैवाहिक आयुष्य काही काळ चांगलं होतं, पण नंतर दुरावा आला आणि ते वेगळे झाले. मग मीना कुमारी यांचं नाव इतर कलाकारांबरोबर जोडलं जाऊ लागलं, पण तरीही त्या शांत राहिल्या. याच काळात दिग्दर्शक म्हणून गुलजार यांच्या पहिल्या ‘मेरे अपने’ चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं आणि त्यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली. मात्र, मीना कुमारी यांच्याप्रमाणेच गुलजार यांनीही या अफवांकडे दुर्लक्ष केलं आणि मैत्रीचा आदर करून मर्यादा जपली. १९७१ मध्ये गुलजार यांना ‘मेरे अपने’ चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. तेव्हा निर्माते एनसी सीप्पी यांनी मुख्य भूमिकेत कोणत्या अभिनेत्रीला घ्यायचं? असं गुलजार यांना विचारलं. मी मीना कुमारींचं नाव सुचवलं, कारण त्या माझ्या क्रश होत्या म्हणून नाही तर त्या या भूमिकेसाठी योग्य होत्या.”
दारूच्या व्यसनामुळे मीना कुमारींना जडला आजार
त्या वेळी मीना कुमारी अवघ्या ३० ते ३५ वर्षांच्या होत्या, पण ‘मेरे अपने’च्या शूटिंगदरम्यान त्या प्रचंड आजारी होत्या. दारूच्या व्यसनामुळे त्यांना ‘लिव्हर सिरोसिस’ झाला होता. पण तरीही त्यांनी शूटिंग केलं. त्या गुलजार यांना सीन्स वाचायला सांगायच्या आणि डोळे मिटून ऐकायच्या. “मीना कुमारी खूप आजारी पडल्या आणि आम्ही त्यांच्यावर एक गाणं चित्रित करू शकलो नाही. त्या लवकरच बऱ्या होतील, याची वाट आम्ही पाहत होतो,” अशी आठवण गुलजार यांनी सांगितली.
मीना कुमारी यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. त्यामुळे त्यांना औषधं घ्यावी लागत होती. परिणामी त्यांना रोजे ठेवणं शक्य नव्हतं. त्या रोजे करण्यावर ठाम असल्याने गुलजार यांनी “तुमच्याऐवजी मी रोजे ठेवतो” असं सांगून त्यांना औषध घ्यायला लावले होते. अशा प्रकारे गुलजार रोजे ठेवू लागले. मीना कुमारी यांच्या निधनानंतरही गुलयार यांनी दिलेल्या शब्दाखातर अनेक वर्षे हा रोजे ठेवले.
‘मेरे अपने’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एका वर्षातच ३१ मार्च १९७२ रोजी मीना कुमारी यांचे निधन झाले. निधनापूर्वी त्यांनी आपल्या कविता आणि वैयक्तिक डायऱ्या गुलजार यांना दिल्या. मीना कुमारी ‘नाझ’ या टोपणनावाने लिहायच्या. त्यांच्या डायरीत काही वादग्रस्त गोष्टी लिहिलेल्या असतील, असं अनेकांना वाटायचं. पण त्यात तसं काहीच नसल्याचं गुलजार यांनी स्पष्ट केलं होतं.
