भारतीय सिनेसृष्टीत असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांची आजही तितकीच चर्चा होते. त्यापैकीच एक म्हणजे ६९ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘प्यासा’ हा ब्लॉकबस्टर चित्रपट. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते गुरु दत्त यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो. आयएमडीबीच्या माहितीनुसार, ‘प्यासा’ हा १९५७ मधील चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. विशेष म्हणजे, या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याबरोबरच गुरु दत्त यांनीच त्यात प्रमुख भूमिकाही साकारली होती. मात्र, चित्रपट पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बातमी समोर आली होती.
हिंदुस्तानच्या वृत्तानुसार ‘प्यासा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याबरोबरच गुरु दत्त यांनी त्यात प्रमुख भूमिकाही साकारली होती, पण या भूमिकेसाठी त्यांची पहिली पसंती अभिनेते दिलीप कुमार होते. यासाठी त्यांनी दिलीप कुमार यांची भेटही घेतली होती. दिलीप कुमार यांनी चित्रपटासाठी होकार दिला होता. मात्र, त्यांनी मानधन म्हणून दीड लाख रुपये मागितले होते. परंतु, नंतर असं काय झालं की गुरु दत्त यांनाचा यामध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम करावं लागलं आणि त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला होता जाणून घेऊयात.
नेमकं काय घडलेलं?
दिलीप कुमार यांनी सांगितलेलं मानधन ऐकल्यानंतर गुरु दत्त यांनी त्यांना मानधन कमी करण्याची विनंती केली. त्यावर दिलीप कुमार यांनी गुरु दत्त यांना पैशांची चिंता करू नका, कारण ते या चित्रपटात काम करत असल्यामुळे त्यांच्या ओळखीचे वितरक (डिस्ट्रिब्युटर्स) हा चित्रपट नक्कीच विकत घेतील, असं सांगितलं. मात्र, यावर गुरु दत्त यांनी आधीच त्यांच्या ओळखीच्या काही वितरकांना आश्वासन दिल्याचं सांगितलं.
उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार, या चर्चेनंतरही दिलीप कुमार यांनी चित्रपटात काम करण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, ‘प्यासा’च्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी ते सेटवर पोहोचलेच नाहीत. गुरु दत्त यांनी त्यांच्या घरी माणूस पाठवल्यानंतर, दिलीप कुमार घरी नसल्याचं समजलं. यानंतर कळलं की, ज्या स्टुडिओमध्ये ‘प्यासा’चं शूटिंग सुरू होणार होतं, त्याच ठिकाणी ‘नया दौर’ चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं आणि दिलीप कुमार तिथे उपस्थित होते. गुरु दत्त यांनी त्यांच्याकडे निरोप पाठवत संपूर्ण टीम त्यांच्या प्रतीक्षेत असल्याचं कळवलं. त्यावर दिलीप कुमार यांनी “मी दहा मिनिटांत येतो,” असं सांगितलं. मात्र, ते त्यानंतरही ‘प्यासा’च्या सेटवर पोहोचले नाहीत. अखेर गुरु दत्त यांनी स्वतःच या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला.
क्लायमॅक्ससाठी तब्बल १०४ रिटेक
‘प्यासा’चं चित्रीकरण सुरू असताना गुरु दत्त यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक अडचणी सुरू होत्या. पत्नी गीता दत्त यांच्याबरोबर असलेले वाद आणि नात्यातील दुरावा याचा त्यांच्या मनावर परिणाम झाला होता. त्याचा प्रभाव चित्रपटाच्या चित्रीकरणावरही दिसून आला. वृत्तांनुसार, गुरुदत्त एका सीनसाठी अनेकवेळा रिटेक घेत असत. त्यामुळे चित्रपटाचं बजेटही वाढत गेलं. काहीवेळा एखाद्या सीनमधून नेमकं काय अपेक्षित आहे, हे त्यांनाच स्पष्ट कळायचं नाही. ‘प्यासा’च्या क्लायमॅक्ससाठी त्यांनी तब्बल १०४ रिटेक घेतले होते. अखेर १०४ वेळा रिटेक घेतल्यानंतर क्लायमॅक्सचं चित्रीकरण संपल्याचं म्हटलं जातं.
चित्रपट पूर्ण होण्याआधीच केला होता आत्महत्येचा प्रयत्न
चित्रपटाचं चित्रीकरण अंतिम टप्प्यात असतानाच गुरु दत्त यांच्यासंबंधीत एक धक्कादायक बातमी समोर आली होती. १९५६ मध्ये ‘प्यासा’चं शूटिंग शेवटच्या टप्प्यात असताना त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जातं. मात्र, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि योग्य उपचारांमुळे त्यांचा जीव वाचला.
‘प्यासा’ या चित्रपटात गुरु दत्त यांच्यासह वहिदा रहमान आणि माला सिन्हा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. IMDb वर या चित्रपटाला ८.३ रेटिंग मिळालं असून, तो प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवरही सुपरहिट ठरला होता. आजही ‘प्यासा’ हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो.
