Guru Dutt slapped wife Geeta: बॉलीवूडमध्ये एकाच सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांच्या नात्याबद्दल अनेकदा अफवा पसरतात. काही वेळा त्या खऱ्या असतात, तर काही वेळा त्यात काहीच तथ्य नसते. गुरू दत्त व वहिदा रेहमान यांनी अनेक सिनेमांत एकत्र काम केले. त्यावेळी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल बोलले जाऊ लागले. ते नात्यात असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या सगळ्याचा परिणाम गुरू दत्त यांच्या पत्नी गायिका गीता दत्त यांच्यावर झाला.
गीता व गुरू दत्त प्रेमात पडले
ज्यावेळी गुरू दत्त अभिनय क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत होते, त्यावेळी गीता स्टार होत्या. गुरू दत्त त्यांचा पहिला सिनेमा ‘बाजी’चे दिग्दर्शन करत होते, गीता त्यावेळी एक लोकप्रिय गायिका होत्या. त्यावेळी त्यांना गीता रॉय म्हणून ओळखले जात होते. गुरू दत्त यांच्या चित्रपटातील ‘तदबीर से बिगडी हुई’ हे गाणे गाण्यासाठी त्यांना निवडले होते. त्यादरम्यानच त्यांच्यात जवळीक वाढली.
गीता त्यांच्या घरातील एकमेव कमावती व्यक्ती होती. आर्थिक गोष्टींसाठी त्यांचे कुटुंब त्यांच्यावर अवलंबून होते. त्यांना तिला जाऊ द्यायचे नव्हते. मात्र, तीन वर्षांनंतर गुरू दत्त व गीता यांनी लग्न केले. गीता स्टार असल्यामुळे त्यावेळी अशा चर्चा झाल्या की गुरू दत्त यांनी पैशांसाठी तसेच प्रसिद्धीसाठी त्यांच्याबरोबर लग्न केले आहे.
इम्प्रिंट मासिकाला दिलेल्या मुलाखतीत गुरू दत्त यांच्या आईने त्यांच्या लग्नाबद्दल वक्तव्य केले होते. त्या म्हणालेल्या, “गुरू व गीताचे लग्न आनंदी असेल असे वाटत होते. याचे कारण म्हणजे गुरूच्या तुलनेत गीताची कमाई जास्त होती. दुसरे म्हणजे दोघेही हट्टी होते आणि तिसरे म्हणजे गुरूच्या खांद्यावर जबाबदाऱ्या होत्या. इतकेच नाही तर महिलांनी दारू प्यायलेलं गुरूला आवडायचं नाही. तो जुन्या विचारांचा होता. त्याला पार्टी आवडायच्या नाहीत. या सगळ्यामुळेच त्यांच्यात दुरावा येत होता. ते सर्व पाहणे वेदनादायी होते. पण, त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे धाडस कोणीही केले नाही.”
गीता यांची लोकप्रियता कमी झाली अन्…
याबरोबरच, काळाच्या ओघात गीता यांची लोकप्रियता कमी झाली होती, त्यामुळे त्यांनी फक्त आपल्या चित्रपटासाठी गाणी गावीत असे गुरू दत्त यांना वाटत होते; त्यावेळी गुरू दत्त लोकप्रिय झाले होते.
गुरू दत्त व वहिदा रेहमान यांचे अफेअर
गुरू दत्त यांनी गीता यांच्या करिअरबद्दल निर्णय घेण्यास सुरुवात केली, ही एकच गोष्ट नव्हती; तर वहिदा रेहमान व गुरू दत्त यांच्या रिलेशनशिपबद्दलही ऐकले होते. त्यांच्या पतीच्या अफेअरबद्दल जाणून घेण्यासाठी त्या अनेकांकडे चौकशी करत होत्या. त्यावेळी ते दोन मुलांचे पालक होते. त्यांनी अबरार अल्वी यांच्याकडेही चौकशी केली. मात्र, त्यांनी तसे काही नसल्याचे सांगितले. मात्र, त्यांना माहीत होते की गुरू दत्त व वहिदा रेहमान यांच्यातील नाते फक्त कामापुरते मर्यादित नव्हते.
जरी अबरार अल्वी यांनी वहिदा व गुरू दत्त यांच्या नात्याबद्दल काहीच सांगितले नसले तरी गीता यांना पती गुरू यांच्यावर विश्वास नव्हता. त्यांनी गुरू दत्त यांना एक पत्र लिहिले आणि वहिदा रेहमान यांची सही केली. पत्रात प्रेमाची कबुली दिली, तसेच त्यामध्ये एका ठिकाणाचे नाव लिहिले आणि तिथे येऊन भेटण्यास सांगितले. गुरू दत्त यांना खात्री होती की हे पत्र वहिदा यांनी लिहिले नसणार. याची खात्री करून घेण्यासाठी ते अबरार यांच्यासह पत्रात लिहिलेल्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा त्यांना गीता यांची गाडी दिसली. सत्या सरन यांनी लिहिलेल्या ‘इन टेन इअर्स विथ गुरू दत्त अबरार अल्वीज जर्नी’ या पुस्तकात याबद्दल लिहिले आहे. अबरारने सांगितले की, “त्या रात्री घरी गेल्यानंतर गुरू यांनी गीता यांना त्यांच्या कृत्याबद्दल जाब विचारला. तसेच, मला गुरू यांनी असेही सांगितले की, त्यांनी गीता यांच्यावर हात उचलला होता.”
“वहिदा रेहमानपेक्षा वाईट…”
पुढे गुरू यांनी त्यांचे लग्न वाचवण्यासाठी पत्नी गीता यांच्याबरोबर एक बंगाली सिनेमा करण्याचे ठरवले. कलकत्तामध्ये शूटिंग सुरू झाले. एके दिवशी गुरू दत्त व गीता यांच्यात मोठे भांडण झाले. स्क्रीनराइटर नबेंदू घोष यांनी त्यांच्या आत्मचरित्रात याबद्दल लिहिले आहे. त्यांनी लिहिले, “संपूर्ण युनिट सेटवर गीता यांची वाट पाहत होते. जेव्हा गीता आल्या, त्यावेळी गुरू दत्त त्यांच्यावर ओरडले. तसेच, त्यांना गीता यांचा मेकअपही आवडला नाही. त्यांना असे वाटले की गीता मुद्दाम त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यांची आरडाओरड सुरू होती. शेवटी गीता म्हणाल्या, “तुम्हाला काय हवे आहे? मी वहिदा रेहमानपेक्षा वाईट दिसावे, असे तुम्हाला वाटते का?” त्यानंतर चित्रपटाचे शूटिंग थांबले आणि गुरू दत्त त्यांच्या ‘कागज के फूल’ या सिनेमासाठी मुंबईला परत आले.
काही काळानंतर गुरू दत्त यांनी त्यांच्या लग्नाला दुसरी संधी देण्याचे ठरवले. वहिदा रेहमान यांना सोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला. गीता यांच्याबरोबरचे नाते सुधारले. त्यांना मुलगी झाली, मात्र पुन्हा त्यांच्यात दुरावा आला.
गुरू दत्त व गीता यांच्या नात्यात अनेक अडचणी आल्या. मात्र, तरीही गीता यांनी शेवटपर्यंत गुरू दत्त यांच्यावर प्रेम केले. त्यांचा मुलगा अरुण यांनी सांगितलेले की, गुरू दत्त यांच्या निधनानंतर गीता यांना मानसिक धक्का बसला होता. त्या अनेक महिने कोणालाही ओळखू शकल्या नाहीत. गुरू दत्त यांचे १९६४ ला, तर गीता यांचे १९७२ ला निधन झाले.
