अक्षय कुमार व सैफ अली खान यांचा ‘हैवान’ अखेर चित्रपटगृहात ११ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. थिएटरमध्ये ‘हनुमान अंश’, ‘मिर्झापूर’ यांसारखे चित्रपट चर्चेत असतानाच ‘हैवान’ रिलीज झाला असून चित्रपटाने पहिल्या दिवशी कोट्यवधींची कमाई केली आहे. पण असं असलं तरी चित्रपटाची सुरुवात संमिश्र प्रतिसादानेच झाली आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित ‘हैवान’ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली जाणून घेऊ.
सॅक्निल्कच्या वृत्तानुसार, ‘हैवान’ने ७,२२४ शोमधून सुमारे ११ टक्के ऑक्युपन्सी नोंदवली. भारतात चित्रपटाने अंदाजे ३.६० कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलं असून, परदेशातील कमाई सुमारे १ कोटी रुपये आहे. त्यामुळे पहिल्या दिवसाअखेर ‘हैवान’चं जागतिक बॉक्स ऑफिस कलेक्शन अंदाजे ४.६० कोटी रुपये इतकं झालं आहे.
सध्याच्या आकडेवारीनुसार ‘हैवान’चं ओपनिंग डे कलेक्शन २०२६मध्ये हिंदी चित्रपटांच्या टॉप २० ओपनिंगमध्ये आहे. मात्र, दोन मोठ्या बॉलीवूड कलाकारांची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाकडून अपेक्षित असलेल्या कमाईच्या तुलनेत ही सुरुवात खूपच कमी मानली जात आहे. विशेष म्हणजे, अक्षय कुमार आणि सैफ अली खान तब्बल १७ वर्षांनंतर पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र आले आहेत. त्यामुळे या जोडीच्या पुनरागमनामुळे चित्रपटाची ऑपनिंग दमदार होणं अपेक्षित होतं.
‘हैवान’ची पहिल्या दिवसाची कमाई अक्षय कुमार आणि सैफ अली खान या दोन्ही कलाकारांच्या चित्रपटांच्या तुलनेत कमी ओपनिंगपैकी एक ठरली आहे. अक्षय कुमारच्या बाबतीत, चित्रपटाने भारतात केलेलं अंदाजे ३.६० कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भूल भुलैया’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षाही कमी आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या वृत्तानुसार ‘भूल भुलैया’ने पहिल्या दिवशी सुमारे ३.८८ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर सैफ अली खानच्या बाबतीतही ‘हैवान’ची ओपनिंग कमीच आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ता रा रम पम’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईच्या आसपासच ‘हैवान’ची कमाई झाली आहे. ‘ता रा रम पम’ने पहिल्या दिवशी अंदाजे ३.६६ कोटी रुपयांची कमाई केली होती.
‘हैवान’ची कथा काय?
प्रियदर्शन दिग्दर्शित ‘हैवान’ची कथा श्याम नावाच्या एका दृष्टिहीन केअरटेकरभोवती फिरते. निवृत्त न्यायाधीश प्रधान यांच्या हत्येचा आरोप श्यामवर लावला जातो. दरम्यान, सूडाच्या भावनेने पेटलेला परशुराम प्रधान यांच्या मुलगी नंदिनीचा पाठलाग करत असतो. पोलिसांपासून पळत श्याम नंदिनीला वाचवण्यासाठी धावतो. मात्र, या प्रवासात श्याम नंदिनीशी संबंधित एक धक्कादायक गुपित उघड करतो, ज्यामुळे संपूर्ण कथेलाच अनपेक्षित वळण मिळतं.
‘हैवान’चं बजेट आणि कलाकारांचं मानधन
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार ‘हैवान’ची निर्मिती अंदाजे १३० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे ११५ कोटी रुपये निर्मिती खर्चासाठी, तर १५ कोटी रुपये प्रिंट आणि जाहिरातींच्या खर्चासाठी वापरल्याचं सांगितलं जात आहे. या एकूण निर्मिती खर्चातील मोठा हिस्सा कलाकार आणि चित्रपटाच्या टीमच्या मानधनावर खर्च झाल्याचंही म्हटलं जात आहे.
