Hansika Motwani breaks silence on divorce : हंसिका मोटवानी गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती. अभिनेत्रीने लग्नाच्या ३ वर्षांनंतर घटस्फोट घेतला. तिने उद्योजक सोहेल खातुरियासह लग्न केलं होतं. अशातच आता अभिनेत्रीने लग्न, प्रेम आणि हृदयभंग याबद्दल तिचं मत मांडलं आहे. 

हंसिकाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला प्रेमामुळे कधी त्रास झालाय का, लग्न आणि पुन्हा प्रेमात पडण्याबद्दलची तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हंसिकाने ‘हॉटरफ्लाय’शी संवाद साधताना याबद्दल सांगितलं आहे. यावेळी मनमोकळेपणाने तिने संवाद साधला आणि घटस्फोटानंतरच्या कठीण काळात तिच्या कुटुंबीयांची तिला खूप साथ मिळाली असंही म्हटलं आहे. हंसिका याबद्दल नेमकं काय म्हणाली सविस्तर जाणून घेऊयात…

हृदयभंग खूप त्रासदायक असतो – हंसिका मोटवानी

हंसिकाला मुलाखतीत जेव्हा तू डेट करायला सुरू केलं तेव्हा कधी हृदयभंग झाला का? असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “हृदयभंग खूप त्रासदायक असतो. पण, आता आपल्याकडे असे अनेक पर्याय आहेत ज्यामुळे आपण यामधून बाहेर येऊ शकतो.” हंसिकाला पुढे लग्न महिलांसाठी इतकं महत्त्वाचं का मानलं जातं आणि ठरावीक वयातच करण्यासाठी बोललं जातं असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “मला माहीत नाही. माझ्याबरोबर तरी झालेलं नाहीये. मला कधीच तुझं वय झालं आहे लग्न केलं पाहिजे असं बोललं गेलं नाही.”

हंसिका पुढे म्हणाली, “बाहेर असे खूप लोक असतात जे तुम्ही काय केलं पाहिजे याबद्दल सांगत असतात. पण, आताच्या मुली खूप खंभीर आणि स्वतंत्र आहेत त्यामुळे त्या तेच करतात जे त्यांच्यासाठी चांगलं आहे. मी तरी कोणाचं ऐकलं नाहीये. आधी २५वर्षांत लग्न करा, मग ३० व्या वर्षी लग्न करा बोललं गेलं आणि आता ४०व्या वर्षी लग्न करा असं म्हटलं जातं. पण लग्नच नाही तर कुठलीही गोष्ट तेव्हाच केली पाहिजे जेव्हा तुम्हाला वाटत असेल.”

हंसिका मोटवानी घटस्फोटाबद्दल काय म्हणाली?

कुटुंबाच्या पाठिंब्याबद्दल हंसिका पुढे म्हणाली, “माझ्या कुटुंबीयांनी मला कधीच कुठल्याच गोष्टीसाठी जबरदस्ती केली नाही.” पुढे तिला आपल्या आयुष्यात जेव्हा कुठली महत्त्वाची गोष्ट घडते पण नंतर जेव्हा ती संपुष्टात येते तेव्हा खूप काही बोलंल जातं असं तुझ्याबाबतीत कधी झालंय का असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “त्यांना क्लिकबीट हवे होते त्यांना ते मिळालं. त्यांना हेडलाईन हव्या होत्या त्यांना त्या मिळाल्या. मी कधीच स्पष्टीकरण दिलं नाही आणि कधी देणारही नाही कारण मला त्यामुळे काहीच फरक पडत नाही. मला अजिबात पश्चाताप नाहीये. चुकीच्या गोष्टी सहन करण्यापेक्षा त्यामधून बाहेर पडलेलं बरं. मला माझ्या कुटुंबाचा खूप पाठिंबा आहे आणि मला याचा जराही पश्चाताप नाहीये. जे आहे ते छान आहे. मी आनंदी आहे.”

पुढे तिला पुन्हा प्रेमला दुसरी संधी देण्याबद्दल विचारल्यनंतर ती म्हणाली, “जर माझ्या नशीबात प्रेम लिहिलं असेल तर मला ते मिळेल. माझा प्रेमावर विश्वास आहे. प्रेम खूप सुंदर असतं. पण, आता सध्या मला ते नको आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा माझ्या आयुष्यात पुन्हा प्रेम येईल. जर तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये चढला असाल तर गरजेचं नाहीये की तुम्हाला पूर्ण प्रवास करावाच लागेल. त्रास होत असेल तर त्यातून बाहेर पडा.”