Hanuman Ansh Box Office Collection Vishal Chaturvedi on Bollywood: आधात्मिक गुरू नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. केवळ २ कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या सिनेमाने ६३ कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे, त्यामुळे सध्या सर्वत्र याच सिनेमाची चर्चा असून बॉलीवूडमधील इतर सिनेमांचे रेकॉर्ड मोडून तो ही कमाई करत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक आणि सह-निर्माते विशाल चतुर्वेदी यांनी बॉलीवूडबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
‘हनुमान अंश’ सिनेमा सध्या चर्चेत असला तरी प्रदर्शित झाल्यावर सिनेमाला शो मिळवताना अडचणी आल्या होत्या. या सिनेमाची फक्त १० लाख रुपयांची ओपनिंग झाली होती. पण, त्यानंतर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे सिनेमाने जोर पकडला आणि आता तो कोट्यवधींची कमाई करत आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात इतर मोठ्या चित्रपटांमुळे ‘हनुमान अंश’च्या शोची संख्या कमी करण्यात आल्याचे दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी यांनी सांगितले. ‘द रौनक पॉडकास्ट’मध्ये त्यांनी याबाबत खुलासा केला आहे.
मल्टिप्लेक्समध्ये शो सुरू ठेवण्याबाबत शंका
विशाल चतुर्वेदी म्हणाले, “लोकांनी या चित्रपटाला पुढे नेले. मोठे चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने थिएटरमालकांनी आमच्या शोची संख्या कमी केली. २५० शोवरून आमची संख्या थेट २५ शोवर आणली होती. पीव्हीआर आणि सिनेपोलिससारख्या प्राइम लोकेशनवरील मल्टिप्लेक्ससुद्धा आमचे शो सुरू ठेवण्याबाबत शंका व्यक्त करत होते.”
पुढे ते म्हणाले, “माझ्या मनात कुठेतरी माझा चित्रपट अपयशी झालाय असे वाटत होते. पण, त्याच वेळी मला इन्स्टाग्रामवर एक पोस्ट दिसली. खरेतर मी अशा पोस्ट सहसा तरी दुर्लक्षित करतो. कारण- अशा पोस्टमध्ये स्वतः मेजेस लिहितात आणि नीम करोली बाबांचे नाव देतात. मात्र, त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, ‘तुमचं काम करत राहा, बाकीची काळजी मी घेतो.’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवड्याच्या शेवटी आलेल्या त्या पोस्टने मला वेगळ्याच प्रकारची प्रेरणा दिली.”
प्रतिसाद पाहून थिएटर मालकही थक्क
यानंतर चित्रपटाबाबत बॉक्स ऑफिसवर चित्र बदलू लागलं. स्वातंत्र्यदिनाच्या आधीच्या शुक्रवारी विशाल, मुख्य अभिनेता शोबिनव सत्य आणि संगीतकार ऋषी पाठक यांच्याबरोबर सुरतला गेले. तिथे चित्रपटाचा केवळ एकच शो होता. मात्र, प्रेक्षकांनी कलाकारांना पाहताच त्यांना मिठी मारली, काही जण भावूक झाले. हा प्रतिसाद पाहून थिएटर मालकही थक्क झाले होते. त्यांनी इतर थिएटरशी संपर्क साधला आणि ‘हनुमान अंश’चे शो वाढू लागले. त्यानंतर वडोदरा, अलीगड यांसह अनेक ठिकाणी चित्रपटाचे शो मोठ्या प्रमाणात वाढले.
विशाल यांनी सांगितलं की, अलीगडमध्ये आमच्या सिनेमाचा एक शो ठेवण्यात आला होता, जो फक्त १५ मिनिटांमध्ये हाऊसफुल झाला. यानंतर त्यांनी टीमबरोबर अनेक शहरांमध्ये, थिएटर आणि मंदिरांमध्ये जाऊन चित्रपटाचे प्रमोशन केले. चित्रपटाला यश मिळाल्यानंतर अनेकांनी फोन करून अभिनंदन केलं. त्यात मधुर भांडारकर यांचाही समावेश होता. मात्र, ज्यांच्याकडे त्यांनी मदत मागितली होती, त्यांनी त्यावेळी मदत केली नाही, त्यामुळे त्यांची नावं घेण्याची इच्छा नाही.
इंडस्ट्रीमध्ये खूप लोक गोंधळलेले – विशाल चतुर्वेदी
‘हनुमान अंश’ हा चित्रपट ‘आवारापन २’ आणि ‘बटवारा’ यांच्याबरोबर प्रदर्शित झाला होता. मात्र, बॉलीवूडने त्यांच्या सिनेमाबाबत घेतलेल्या भूमिकेवर विशाल चतुर्वेदी यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “जेव्हा मी बॉलीवूडमधील लोकांशी मदतीसाठी संपर्क साधला, तेव्हा कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. लोकांना काय चालणार आहे हे बहुतेक वेळा माहीत नसते, तरीही ते इतरांना आपलं ज्ञान देत असतात. इंडस्ट्रीमध्ये खूप लोक गोंधळलेले आहेत. काही लोकांना खरंच चित्रपट बनवायचे असतात, तर काहींना त्याची आवड नसते आणि फक्त एकदा सिनेमा बनवून बघावा, म्हणून ते करत असतात.”
दरम्यान, भारतात बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केल्यानंतर आता ‘हनुमान अंश’ आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार आहे. ११ सप्टेंबर २०२६ रोजी ‘हनुमान अंश’ हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे भारताबाहेर राहणाऱ्या आणि नीम करोली बाबा यांच्या भक्तांना सिनेमा पाहण्याची संधी मिळणार आहे.
